शिवसेना नेत्यांवर गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. सध्या किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात आरोपांचा मारा केला आहे. संजय राऊत आणि त्यांचे मित्र सुजित पाटकर १०० कोटींचा कोविड सेंटर घोटाळा केला, असा धक्कादायक खुलासा सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता. याच रागातून ८० ते १०० शिवसैनिकांच्या जमावाने किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केली.
पुणे महापालिकेमध्ये या प्रकरणा संदर्भात जात असताना किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. या प्रकरणी केवळ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून शिवसैनिकांनी धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना या दरम्यान पायऱ्यांवर पडल्याने त्यांना दुखापतही झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखून सावध भूमिका घेत, सोमय्या यांना त्या गर्दीतून उचलून गाडीत नेऊन बसविले.
या घटनेवर भाजप आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून, अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला इशाराही दिला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर नसल्याने, थेट गुंडागर्दीवर उतरायचे का? आम्ही कायदा पाळतो, पण म्हणून अशी गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही! महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध!” असं देवेंद्र फडणवीसनी ट्वीट करून म्हटले आहे.
आम्ही जेलमध्ये जाऊ हे किरीट सोमय्या यांचे ‘मंगेरीलाल के हसीन सपने’ असल्याचे परब म्हणाले. किरीट सोमय्या यांनी लावलेल्या आरोपांवर बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी “मी संबधित यंत्रणेला उत्तरे देईन”, असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, आरोप करताना नैतिकता पाळावी, अशा परखड शब्दात प्रतिक्रिया दिली.