रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकारणात रामदास कदम विरुद्ध पालकमंत्री अनिल परब हा वाद उभ्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. पण त्याला आता एक नवे वळण मिळाले असून, शिवसैनिकांनीच पालकमंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवसैनिकांनी आपल्यावर होत असलेला अन्याय समोर मांडला आहे त्यामुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ माजली.
हा वाद रत्नागिरीपुरता मर्यादित असला तरी चिपळूण शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पण ही बैठक वादग्रस्त ठरली. उदय सामंत आणि अनिल परब यांच्या राजीनाम्याचीच मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली आहे. शिवसंपर्क अभयानाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे पार पडलेल्या बैठकीत पाच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्याबाबत तर उघड नाराजी व्यक्त करत त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
४ तास पार पडलेल्या या बैठकीत पालकमंत्री परब यांच्या बद्दल नाराजीचा सूर दिसून आला. उत्तर रत्नागिरी भागातील गुहागर, दापोली, खेड, मंडणगड या पाच तालुक्यातून आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री बदलण्याच्या मागणीसाठी जोर धरला आहे. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री आले आणि दोन गटात वाद पेटवून निघून गेले. असे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याला नको. त्यामुळे पालकमंत्री म्हणून परबांना हटवण्यात यावे, अशी आग्रही मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मात्र, रत्नागिरी शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, याबाबत शिवसेनकडून कोणत्याही नेत्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.