रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महायुतीच्या नेत्यांमधील वाद आता चव्हाट्यावर येवू लागले आहेत. युती करण्यावरून युतीतील तिन्ही पक्षांतील नेते आमने-सामने आल्याने हा वाद आता वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात पोहचला आहे. भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यात युती म्हणून निवडणुका लढवल्या जाणार की नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असल्याने आता याकडे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांमध्ये युती करण्यावरून खडाजंगी उडण्यास सुरुवात झाली आहे. युती करण्यावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गट यामध्ये जोरदार खटके उडू लागले आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाबरोबर युती नको, अशा स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. यावरून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांना हे चांगलेच झोंबले आहे. यामुळे सामंत यांनी भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा चिपळूण येथील एका मेळाव्यात समाचार घेतला आहे.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जण युती नको म्हणून प्रयत्नशील असल्याचे सांगून या दोन्ही पक्षातील नेत्यांना मंत्री उदय सामंत यांनी डिवचले आहे. यावरुन आता जिल्ह्यात सामंत यांच्याविरोधात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे वाढते वर्चस्व लक्षात घेता या पक्षाला रोखण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी युती नकोचा पर्याय निवडला आहे. भाजपाने रत्नागिरी जिल्ह्यात वर्चस्व वाढविण्यासाठी जिल्हा संपर्कमंत्री म्हणून नीतेश राणे यांची नेमणूक करण्यात आल्यावर राणे यांनी मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात जिल्ह्यात काम करण्यास सुरुवात केली. अनेक वेळा या दोन्ही मंत्र्यांमध्ये राजकीय घमासान होत असल्याचे पाहावयास मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व कमी करण्याचा विडा भाजपच्या नेत्यांनी उचलला असताना आता यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी देखील उडी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी शिवसेना शिंदे गटाबरोबर युती न करता येणाऱ्या सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. तशी घोषणाच आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शिवसेनेबरोबर युती नको अशी भूमिका घेतल्याने आता शिवसेना शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या सर्व प्रकारानंतर मंत्री उदय सामंत यांनी देखील युती नाही झाली तर स्वबळावर निवडणुका लढण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र महायुतीतील या नेत्यांमधील वाद शिवसेना ठाकरे गटाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. जिल्ह्यातील महायुतीचा वाद आता वरिष्ठांकडे गेल्याने युती बाबत कोणता निर्णय घेतला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

