दापोली शहर हे पर्यटनदृष्ट्या नावारूपाला येत असून, तिथे अनेक पर्यटक राज्यभरातून भेट देतात; मात्र शहरामध्ये त्यांचा विरंगुळा व्हावा यासाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामध्ये लक्ष दिले असून, दापोली शहरातील रस्ते, पदपथ व सरकारी जागा यांचा विकास व्हावा यासाठी आपण पुढील टप्प्यात निधी आणणार आहोत. केळस्कर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानजीक शिवसृष्टी उभारण्याचा मानस आहे, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले तसेच दापोली शहरासाठी लवकरच नळपाणीपुरवठा योजना मंजूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दापोली शहरातील स्टेट बँकेसमोरील ओपन जिम आणि गार्डनच्या भूमिपूजनप्रसंगी गृहराज्यमंत्री कदम बोलत होते. यावेळी कदम म्हणाले, दापोली शहरात काम करताना सुमारे अडीच एकर जागा पडीक असल्याचे लक्षात आले. त्यावेळी तिथे सुसज्ज बागेचा आराखडा तयार केला आणि तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून २ कोटी ३० लाख रुपयांचा निधीही मंजूर करून घेतला. दापोली शहरातील विविध सरकारी जागांचे सातबारे व नकाशे
काढून घेतले आहेत. त्या गार्डनच्या शेजारी वाहणाऱ्या नदीमध्ये बोटींग प्रकल्प सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी नदीवर बंधारा बांधणे गरजेचे असून, पाणी स्वच्छ करण्यासाठी एसटीपी प्लँट बसवला पाहिजे. या माध्यमातून बारा महिने पाणी असेल तर तिथे बोटींग होऊ शकते. मच्छी मार्केटचे स्थलांतर कोषीबांधवांना विश्वासात घेऊन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमावेळी उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, शिवसेना तालुकाप्रमुख उन्मेष राजे, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, शहरप्रमुख प्रसाद रेळेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर, कार्याध्यक्ष मोहन मुळ्ये, माजी समाजकल्याण सभापती चारूता कामतेकर, महिला संघटक दीप्ती निखार्गे, माजी उपनगराध्यक्ष भाऊ मोहिते, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष संदीप केळकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रितम रूके उपस्थित होते.
जनतेला विकासकामांमधून विश्वास द्या – दापोली शहरामध्ये महायुतीची सत्ता असून, १७ पैकी १६ नगरसेवक हे महायुतीचे आहेत. त्यामुळे निधी आणण्यात कोठेही मागे पडणार नाही. नगरसेवकांनी विकासकामे करण्यासाठी पाठपुरावा करावा व जनतेलाही हीच कार्यकारिणी पुन्हा हवी असा विश्वास वाटेल, असे आपण काम करूया, असे मंत्री कदम यांनी सांगितले.