वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळून वीज वाहिन्यांवर पडत असल्याने अनेकदा वीज प्रवाह खंडीत होतो. यावर मात करण्यासाठी कोकण किनारपट्टीवर भूमीगत विद्युत वाहिनी टाकण्यात आली. मात्र आता या वाहिनीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. रत्नागिरी शहरानजिक मिऱ्या गावात भूमिगत विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने दोन जनावरांचा मृत्यू झाला तर एक जनावर बेशुध्द पडले. यामुळे सर्वत्र घबराट पसरली. संबंधित ठेकेदाराला खबर देण्यात आली मात्र त्याने कानाडोळा केल्याने ग्रामस्थ संतापले. त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला घेराव घातला. अखेर वीज पुरवठा बंद करण्यात आला.
अशाप्रकारे भूमिगत वीज वाहिनीतून वीज प्रवाह बाहेर पडत असेल तर ते सर्वसामान्यांच्या जीविताच धोकादायक असल्याचा सूर उमटला. मिऱ्या गावात उपळेकर बाग परिसरात हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. तौक्ते चक्रीवादळानंतर याठिकाणी भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्याच्या कामाला वेग आला होता. लीना पॉवरटेक कंपनीने या कामाचा ठेका घेतला होता. काम पूर्णत्वाला जाऊन भूमिगत विद्युत प्रवाह सुरुही करण्यात आला. मात्र या कामात काही त्रुटी राहिल्याचे म्हटले जात आहे. याचा पहिलाचं फटका मिऱ्यावासियांना बसला आहे. दुर्दैवाने यात निष्पाप मुक्या जनावरांचा जीव गेला आहे.
सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी घडलेली नसली तरी आता भूमिगत वीजवाहिनी धोकादायक असल्याचे ग्रामस्थांना वाटू लागले आहे. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भूमिगत विद्युतवाहिनीसाठी टाकण्यात आलेल्या ट्रान्स्फॉर्मरमधून शॉक लागत असल्याची माहिती महावितरणला काही ग्रामस्थांकडून देण्यात आली होती. याच दरम्यान एक गाय व एक म्हैस शॉक लागून मरण पावली. गाय डीपीच्या बाजूने जात असताना त्या गायीला अचानक वीजेचा जोरदार झटका बसला. गाय रस्त्यावर फेकली गेली. काहीकाळ ती तडफडत होती त्यानंतर ती मृत्यू पावली.
ग्रामस्थांनी तात्काळ झाडगाव उपकेंद्रात संपर्क केला आणि झालेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वीजपुरवठा बंद केला. भूमिगत वाहिनीतून अशाप्रकारे वीज प्रवाह बाहेर पडत असल्याने परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशाप्रकारे वीज प्रवाह बाहेर पडून कोणत्याही स्वरुपाची मनुष्यहानी होऊ नये याकरता ग्रामस्थ रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर उभे होते. त्याचबरोबर रात्रभर वीजेचा लपंडावही सुरु होता. इतके सगळे होऊनही भूमिगत वीज वाहिनीचे काम करणारा ठेकेदार किंवा त्याच्या कंपनीचे लोक घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
अखेर ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घेराव घातला आणि जाब विचारला. त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. वरिष्ठांनी त्याठिकाणी धाव घेतली व त्यांची समजूत घातली. त्यानंतर पेच निवळला. भूमिगत वीज वाहिनीतून वीजप्रवाह बाहेर पडत असल्याच्या प्रकाराचे वृत्त सर्वत्र पसरताच लोकांमध्ये भीती निम णि झाली होती. जनावरांऐवजी एखाद्या माणसाला शॉक लागला असता तर काय घडले असते या कल्पनेनेच अनेकजण हादरले. हा प्रकार नेमका कशामुळे होत आहे याचा शोध घ्यावा व त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.