या वर्षी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे धरणातील पाणी वीज निर्मितीसाठी वाहून नेणाऱ्या बोगद्याला लागलेली गळती वेळेत काढली नाही तर या वर्षी वीज निर्मितीसाठी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. वाया जाणाऱ्या पाण्यामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. कोयना धरण आणि वीज निर्मिती प्रकल्पाची मालकी जलसंपदा विभागाकडे आहे; मात्र कोयना वीज निर्मिती प्रकल्प जलसंपदा विभागाने महानिर्मिती कंपनीला चालवण्यासाठी दिले आहे. वीज निर्मितीसाठी कोयना धरणातून महानिर्मिती कंपनीला पाणी दिले जाते. त्या बदल्यात महानिर्मिती कंपनी जलसंपदा विभागाला रॉयल्टी देते.
पोफळी येथील टप्पा एक आणि दोनकडे येणाऱ्या बोगद्याला गळती लागली आहे. त्यामुळे कोयना धरणातून पोफळीकडे येणारे पाणी सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाया जात आहे. वाया जाणारे पाणी नदीतून वाहून जात आहे. महानिर्मिती कंपनीला मात्र या पाण्याचा मोबदला जलसंपदा विभागाला द्यावा लागणार आहे. त्यामुळे महानिर्मिती कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी महानिर्मिती कंपनीने लवकरात लवकर गळती निघावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यात सध्या जाणवणारी मोठी पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी सुरू झाली आहे.
कृष्णा पाणीवाटप लवादानुसार धरणातील ४० टीएमसी पाणी सिंचनासाठी सोडले जाते. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. सिंचन व वीज निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या पाणीवाटपाचे सूत्रबद्ध पद्धतीने फेरनियोजन झाले नसल्याने पाणीवाटपात अडचण येत आहे. सध्या धरणात ८९ टीएमसी साठा आहे. धरणाचे दोन्ही वीजगृहांचे युनिट चालू करून धरणातून पूर्वेकडील सिंचनासाठी २१०० क्युसेक पाणीसाठा सोडण्यात येत आहे.