जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरीही २९७ वाड्यांना २६ टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. सध्या पडत असलेला पाऊस पाणीटंचाई निवारणारा नाही. सध्या ६० हजार ५२३ लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. एप्रिल, मे या दोन महिन्यांत कडाक्याच्या उन्हाचा त्रास जिल्हावासीयांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे नद्यानाले यांसह विहिरी, तलाव कोरडे पडले होते. यंदा टँकरने पाणीपुरवठा करण्याची सुरवात लांजा तालुक्यात झाली. त्यानंतर खेड, चिपळूण या दोन तालुक्यात टँकर धावू लागले.
जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यातील वाड्यात टँकर धावले. १५ गावांतील ९० वाड्यांना १४ खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २६ हजार ५९६ लोकांना याचा लाभ मिळत आहे. जूनच्या सुरवातीला पावसाचे आगमन झाले; मात्र अपेक्षित पाऊस झालेला नाही. डोंगरवस्तीत वसलेल्या वाड्यांना अजूनही टँकरचाच आधार आहे. येत्या चार दिवसात मुसळधार पाऊस पडेल, अशी आशा नागरिकांना आहे.