श्रद्धा खून प्रकरणात गुरुवारी पोलिसांना मोठे यश मिळाले. दिल्लीच्या जंगलात सापडलेल्या हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांशी जुळला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही हाडे मेहरौली आणि गुरुग्रामच्या जंगलात सापडली होती. आफताबच्या सांगण्यावरून ही हाडे जप्त करण्यात आली. डीएनए चाचणीत याची पुष्टी झाल्याचेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. जंगलात सापडलेली हाडे फक्त श्रद्धाचीच आहेत. दुसरीकडे, दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरांनी ट्रायल कोर्टात श्रद्धा हत्याकांडासाठी विशेष सरकारी वकिलांना परवानगी दिली आहे.
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यासोबतच खुनाचा आरोपी आफताबचा क्रूरपणा आणि भितीदायक चेहऱ्याची कहाणीही समोर येत आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय आफताबने १८ मे रोजी २७ वर्षीय श्रद्धाची हत्या केली होती. दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. त्यांना ठेवण्यासाठी ३०० लिटरचा फ्रीज घेतला. तो १८ दिवस रोज रात्री २ वाजता मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी जंगलात जात असे.
गेल्या महिन्यात आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये त्याने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली. आफताबची दिल्लीतील बाबा साहेब आंबेडकर रुग्णालयात २ तास नार्को चाचणी करण्यात आली. आफताबने परीक्षेत विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली. पॉलीग्राफ चाचणीत त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबुलीही दिली होती, तरीही त्याने हत्येचा पश्चाताप होत नसल्याचे सांगितले.
आफताबला रोहिणी एफएसएलमध्ये पॉलीग्राफ चाचणीसाठी घेऊन जात असताना त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. रोहिणीतील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी बाहेर आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर ४-५ जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात तलवारी होत्या. या हल्लेखोरांपासून पोलिसांनी आफताबला वाचवले होते.
आफताबला १२ नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. १७ नोव्हेंबर रोजी त्याच्या कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला २६ नोव्हेंबर रोजी पुन्हा १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.