अनेक भारतीय शिक्षण, उद्योग, व्यवसायासाठी परदेशामध्ये जातात. अनेक जण तिथेच स्थायिक सुद्धा होतात. पण आपल्या देशाशी जुळलेली नाळ मात्र कायम टिकून असते. अनेक भारतीय मिळून तिथे परदेशामध्ये सुद्धा मंडळे स्थापन करून सर्व सण समारंभ एकत्रित मिळून साजरे करतात. तेथील कार्यक्रमाअंतर्गत यश मिळवून अनेक जण भारताच्या शिरपेचात यशाचा तुरा झळकावतात.
अशीच एक तळकोकणातून आलेली मुलगी, मुळची मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील असलेली श्रीया परब हिने लेबनान येथे २२ देशांच्या राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स – २०२१ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला असून, ती मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया २०२१ ची विजेती ठरली आहे. भारताचे प्रतिनिधित्व तिने या स्पर्धेमध्ये केले होते.
२०१७ साली झालेल्या मिस अप्सरा महाराष्ट्राचीमध्ये श्रीया हि अंतिम विजेती ठरली होती. तर मिस एशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये तिने रनरअप हा किताब पटकावला होता. ऑगस्ट २०२१ मध्ये मुंबई मध्ये झालेल्या मिस तियाराची ती विजेती बनली होती. या स्पर्धेमध्ये विविध देशातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. परंतु, विजेतेपद मिळाल्याने लेबनॉनमध्ये झालेल्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करायची संधी तिला मिळाली. आत्ता मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१ या स्पर्धेमुळे श्रीयाने भारताचे नाव उज्वल केले आहे.
श्रीयाच्या सर्व सादरीकरणाने तिने अंतिम फेरी दरम्यान परीक्षकांची मने जिंकून घेतली आणि तिने मिस टुरिझम युनिव्हर्स आशिया २०२१ हा किताब पटकावून परदेशामध्ये म्हणजेच लेबनानमध्ये भारताचा तिरंगा फडकवला. भारताचा तिरंगा अटकेपार फडकावल्याने सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.