भारत आफ्रिकेपासून तुटला त्या वेळी ज्या भेगा पडल्या आणि त्यामधून खाड्या तयार झाल्या आहेत त्या जमिनीला पडलेल्या भेगांतून नदी वाहते आणि मार्गक्रमण करत खाडीला नदी मिळते. कोकण समुद्राच्या पातळीवर असल्यामुळे मुखाशी गाळ साचत चालला आहे. त्यामुळे खाड्या भरणे, नदीपात्र भरणे, खाड्या आत शिरणे ही गोष्ट होत आहे. यातून खारेपण वाढत आहे. हे हळुहळू वाढत जाणार आहे. ही नैसर्गिक गोष्ट असून, ती मान्य केली पाहिजे. त्याला ड्रेझिंग करणे हा पर्याय आहे तसेच नद्यांमध्ये अंतर्गत बंधारे बांधल्यास जवळच्या वाडीवस्तीतील पाणीटंचाई दूर करता येईल, असा विश्वास भूगर्भतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबालकर यांनी व्यक्त केला. डॉ. वडगबालकर म्हणाले की, कोकण व महाराष्ट्राचा भाग लाव्हारसाच्या खडकापासून बनला आहे. तो टोपीसारखा बसलाय व खालच्या खडकावर आहे. हे खडक फक्त दक्षिण कोकणात दिसतात. नागपूर व भंडाऱ्याचा भागही वेगळा आहे. लाव्हारस साडेपाच कोटी वर्षांपूर्वीचा आहे. भारत आफ्रिकेपासून सरकत होता.
हिमालय धडका मारून तयार होताना सह्याद्री हा भाग उचलला गेला व सह्याद्री पर्वत झाला. पश्चिम किनारपट्टी ही थोडी वर उचलली गेली आहे. यामुळे गाळ जमा होण्याचे प्रमाण जास्त आहे. पूर्व किनारपट्टीवर ते प्रमाण नाही. त्यामुळे तिथे चांगली बंदरं आहेत. अशी बंदरं पश्चिम किनारपट्टीवर नाहीत. जागतिक टेंडर काढून सुवेज कालव्यातील गाळ काढला जातो. अशी प्रक्रिया आपल्याकडे केली जात नाही. मेरीटाईम बोर्ड, एनआयओ, सरकारने या गोष्टी काढल्या पाहिजेत. आता गोडं पाणी खारं होऊ लागले आहे. कोकण हे पर्यटनाचे केंद्र आहे; पण विहिरीतले पाणी पुरत नाही म्हणून विंधण विहीर खोदतात; परंतु उपसा वाढल्याने गोड्या पाण्याची साठवण कमी होऊन खारे पाणी आत शिरते. पर्यटन विकासात हा अडथळा आहे. गोड्या पाण्याची साठवण करणे, हा एकच पर्याय आहे. समुद्राचे पाणी आत येणार नाही याकरिता लोकसहभाग, लोकशिक्षणातून प्रयत्न करू शकतो, असे डॉ. वडगबालकर म्हणाले.
गाळ परत न येण्यासाठी प्रयोग – १० हजार वर्षांपूर्वी अतिप्रचंड पाऊस होता. कोंडीतील गाळ, जाडी रूंदीचा अभ्यास केला तर ते कळेल; परंतु गेल्या पाच हजार वर्षांत पावसाचे प्रमाण कमी-जास्त होऊ लागले. वाहत्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे गाळ उचलण्याची शक्ती प्रवाहात राहत नाही. पूर्वी प्रवाह जमीन खरडून काढून गाळ पुढे नेला जात होता. कोंडीतील गाळ उचलण्याची ताकद आता पाण्यात राहिली नाही; पण कोंडीतील गाळ काढला पाहिजे व पुन्हा गाळ येऊ नये याकरिता खबरदारी घेतली पाहिजे. त्याचे डिझाईन करणे आवश्यक आहे. आम्ही प्रयोग करणार आहोत यामुळे वाहते पाणी राहील, असे डॉ. वडगबालकर यांनी सांगितले.