23 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeRatnagiriसंगमेश्वर तालुक्यातील आठ नद्यांत गाळ

संगमेश्वर तालुक्यातील आठ नद्यांत गाळ

नदीतील पाणी लगतच्या शेतीत घुसून ओढे व नाल्यांना पूर येतो.

संगमेश्वर तालुक्यातील गडनदीसह शास्त्री, सोनवी, असावी, अलकनंदा, काजळी, सप्तलिंगी, बावनदी या नद्यांमधील गाळ उपसा करण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून शासन दरबारी करणार असल्याचे अल्पसंख्यांक समाजाचे जिल्हाध्यक्ष व संगमेश्वर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य जाकीर शेकासन यांनी सांगितले. संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेकडील गडनदीचे पात्र मोठ्या प्रमाणात गाळाने भरले आहे. त्यामुळे नदीचे पात्र विस्तारले असून, पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की लगेच नदीलगतची शेती व रस्ते पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत होते. पुराचे पाणी दुकानात जाऊन व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान होते. ही समस्या दरवर्षी नागरिकांना भेडसावते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणजे नदीचा गाळ काढणे होय. म्हणूनच गडनदीसह अन्य नद्यांमधील गाळ उपसा काढणे गरजेचे आहे. गडनदीचा उगम सह्याद्रीच्या खोऱ्यातून झाला आहे.

राजीवली, कुचांबे, कुंभारखाणी, मुरडव, आरवली, कोंडिवरे, माखजन या गावांतून ही नदी करजुवे येथे अरबी समुद्राला मिळते. या नदीवर कुचांबे येथे गडनदीवर मध्यम आकाराचे मातीचे धरण बांधले आहे. हे काम करत असताना मोठ्या प्रमाणात दगडमाती नदीपात्रात वाहून आली आहे तसेच पात्रात मोठ्या प्रमाणात झुडपे व झाडी वाढल्याने नदीतील पाण्याला अडथळा निर्माण होऊन नदीतील पाणी लगतच्या शेतीत घुसून ओढे व नाल्यांना पूर येतो. तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या वेळी गडनदीतील गाळ उपसा करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देऊ, असे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप निधी मिळाला नसल्याने गाळ उपशाचे काम झालेले नाही. धामणीकडून संगमेश्वरकडे वाहणाऱ्या नदीमुळे कसब्याजवळची शेती गिळंकृत केली आहे.

धामणी, आंबेडखुर्द या भागातही नदीच्या काठावरील शेतीला धोका पोहचला आहे. शास्त्री आणि सोनवीच्या संगमाच्या पुढे असणाच्या गावांमध्ये तर नदीच्या बदलत्या प्रवाहाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना दरवर्षी बसत आहे. या नद्यांच्या पात्रात जमा झालेला गाळ उपसा करावा, अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे; पण याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

शेती कुजण्याचेही प्रमाण वाढले – गडनदीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका आरवली आणि माखजन येथील बाजारपेठांना बसतो तसेच अनेक गावांतील नदीकिनाऱ्यावरील शेती वाहून जाते. सखल भाग असल्याने पुराचे पाणी शेतीमध्ये थांबून शेती कुजण्याचेही प्रमाण वाढले आहे.

धामापूर परिसरात संरक्षण भिंत – धामापूर आणि काही भागात गडनदीच्या भरतीचे खारे पाणी शेतजमीन क्षेत्रात घुसल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. त्यामुळे खार जमीन प्रतिबंधक उपाय म्हणून या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीही बंदर खात्याकडे पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे, असे शेकासन यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular