वाशिष्ठी नदीत गाळ उपसा सुरू असला तरीही त्याला मोठ्या प्रमाणात गती मिळालेली नाही. यंत्रसामुग्री कमी असल्याने धीम्या गतीने हे काम सुरू आहे. यांत्रिकी विभागाच्या यंत्रणेसोबत अधिकची यंत्रणा मिळाली तर कमी वेळेत जास्त गाळ काढला जाऊ शकतो, अशी सूचना चिपळूण बचाव समितीतर्फे करण्यात आली होती. या कामाला गती मिळावी यासाठी गाळ काढण्यासाठी पोकलेन आणि डंपर पाठवावेत, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी नामकडे केली आहे. मागील चार वर्षांपासून वाशिष्ठी आणि शिवनदीला गाळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी नलावडे बंधारा उभारणी कामाचा प्रारंभ झाला आणि गाळ काढण्याची मोहीम पुन्हा हाती घेण्यात आली. या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली सावर्डे येथे बैठक झाली.
या बैठकीला प्रांताधिकारी आकाश लिगाडे, जलसंपदा विभागाचे गणेश सलगर, विपुल खोत, मुख्याधिकारी विशाल भोसले, चिपळूण बचाव समितीचे सदस्य बापू काणे, शहानवाज शाह, महेंद्र कासेकर, किशोर रेडीज, उदय ओतारी उपस्थित होते. वाशिष्ठी नदीत गाळ उपसा वेगाने करण्यासाठी चिपळूण बचाव समितीकडून सूचना करण्यात आल्या. या कामाला गती मिळावी यासाठी पोकलेन आणि डंपर पाठवावेत, अशी मागणी आमदार निकम यांनी नाम संस्थेकडे केली आहे. उक्ताड, बाजारपूल, पेठमाप, सुवेज कालवा, शिवनदी या ठिकाणी पहिल्या टप्प्याचे काम अधिक मशिनरी लावून पूर्ण करण्याच्या सूचना प्रांताधिकारी आकाश लिगाडे आणि आमदार निकम यांनी जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाला दिल्या आहेत.
गोवळकोटजवळ गाळाचा डोंगर – वाशिष्ठी नदीच्या मुखाजवळ गोवळकोट, मुशी येथे मोठा गाळाचा डोंगर साचलेला आहे. तो काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यावर चर्चा करण्यात आली.