सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे कणकवलीवरून पर्यटनासाठी आलेल्या जान्हवी शिंदे ही महिला हिरण्यकेशी नदी किनारी सेल्फी घेत असताना तोल जाऊन नदीत पडली. त्यांना वाहत जाताना पाहून त्यांच्या मुलाने आणि नवऱ्याने आरडाओरडा केला. अंदाजे २०० मीटर वाहत गेल्यानंतर जान्हवी यांच्या हाताला नदीतील एक झुडूप लागले.
त्या झुडपाला धरून जान्हवी यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरु केली. तोपर्यंत रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं होतं. पण त्या आधीच परिस्थितीचा अंदाज घेऊन आंबोली पोलीस स्थानकाचे हवालदार दत्ता देसाई यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली. दत्ता देसाई यांनी त्या महिलेला दोरखंडाच्या साहाय्याने नदीकिनारी ओढत आणलं. परंतु, पोटात पाणी गेल्यामुळे आणि आपण बुडणार या भीतीमुळे घाबरल्यामुळे महिलेला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान आणि धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. नदी, समुद्र, धबधबे यांच्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणहून आलेल्या पर्यटकांनी वातावरण आणि परिस्थितीचे ध्यान ठेवूनच वागावे. शासनाकडून अनेकवेळा सूचना देऊन सुद्धा पर्यटकांच्या आतताईपणामुळे अनेकांच्या जीवावर घटना बेतू शकतात. त्यासाठी विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
हल्ली अनेक पाण्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो, कारण बाहेरगावाहून येणारे पर्यटक यांना येथील नदी, समुद्र, धबधब्याचा फारसा अंदाज नसतो. त्यामुळे काही जण दंग मस्ती, फोटो काढण्याच्या नादामध्ये खोल पाण्याकडे जातात आणि मग अशा प्रकारच्या दुर्घटना घडण्याचे प्रकार घडत असतात. स्वत: सोबत दुसर्याचा पण जीव धोक्यात घालण्याच्या घटना यामध्ये घडतात.