गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार नाही. ज्या नागरिकांच्या कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले नाही, त्यांनी मात्र जिल्हयात प्रवेश करण्यापूर्वी ७२ तास पूर्वीचा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे गरजेचे आहे. परंतु, १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण केले जात नसल्याने त्यांच्या प्रवेशाला मात्र आरटीपीआर चाचणी अहवाल आवश्यक राहणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊनही आरटीपीसीआर चाचणी सक्तीने करायला लावली जात आहे, त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण गेल्या चार महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकावर अँटीजेन व आरटीपीसीआर टेस्ट सक्तीने केली जात आहे. गणपतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन ज्यांचे १५ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना निर्बंधित आरटीपीसीआर टेस्टची आवश्यकता नाही. महाराष्ट्राचे नियम पाळले जातील, असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. यामुळे चाकरमानी १०-१२ तास प्रवास करून येतात आणि पुन्हा चाचणीसाठी रांगेत उभे राहण्याने त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. इतकेच नव्हे तर दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाही टेस्ट सक्तीची केली जात असल्याने चाकरमानी त्रस्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे शासनाच्या https://epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm या संकेतस्थळावरुन दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांनी प्राप्त होणारा Universal Pass उपलब्ध करुन घ्यावा. जेणेकरुन प्रवासा दरम्यान तपासणीकरिता लागणाऱ्या वेळेची बचत होईल. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गणेशोत्सव २०२१ चा सण साजरा करण्यात यावा असेही यात म्हटले गेले आहे.