सिंधुदुर्गातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीच्या काही विभागांच्या निवडणुका सुद्धा १७ रोजी पार पडल्या आणि त्यांचे निकाल देखील हाती आले आहेत. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या दोन नगरपंचायतीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगल्याचे चित्र दिसून आले होते. यामध्ये वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे, तर कुडाळ नगरपंचायतीमध्ये मात्र भाजपला पीछेहाट मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात होती. या निवडणुकीवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्याप्रमाणे वैभववाडी नगरपंचायतीवर नारायण राणेंच्या गटाने वर्चस्व राखले आहे. वैभववाडी नगरपंचायती निकालामध्ये १७ जागांपैकी भाजपला १० जागावर वर्चस्व मिळाले आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला ५ जागा आल्या आहेत. अपक्षांच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खाते उघडता आलेले नाही.
दुसरीकडे नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेल्या कुडाळ नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांपैकी भाजपचे ८ जागांवर वर्चस्व सिद्ध झाले आहे. शिवसेना ७ तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. जरी सर्वांत जास्त जागा भाजपला मिळाल्या असल्या तरी राणेंना तिथे एकहाती सत्ता मिळवता आली नसल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. या नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येणार हे सध्या सांगता येत नाही. कारण काँग्रेसच्या पाठिंबा कोणाला मिळणार यावर सत्तेची सगळी गणित अवलंबून आहेत.