सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका शुक्रवार, दि. २७ मे पासून सुरू होणार आहे. परंतु, सध्या सुरु असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रलंबित असताना राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत असताना टोल नाका सुरू करण्यात आल्याने सिंधुदुर्गातील जनता आश्चर्य व्यक्त करत आहे.
आज दि. २७ मेपासून ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ठेका मिळालेल्या एम. डी. टोल कंपनीकडून देण्यात आली. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग ६६ ची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. मात्र असे असताना ओसरगाव टोलनाक्यावरून उद्यापासून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे. टोल नाक्याच्या परिसरापासून वीस किलोमीटर परिघामध्ये येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयांचा पास देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर वाहनांना टोल भरावा लागणार आहे. दुचाकी व तीनचाकी गाडय़ांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. तसेच फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
टोल नाक्यावर स्थानिकांना रोजगार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना संपूर्ण टोल माफी मिळत नाही आणि जिल्ह्यातील महामार्गाची निलंबित कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ओसरगाव येथील टोल नाका चालू करू देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत यांनी ओसरगाव येथील हायवे टोल कार्यालयावर धडक दिली.
महामार्गाची कामे अपूर्ण असताना हायवे कंपनीने ओसरगाव येथील टोल सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण पर्यटन विकास महामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर व शिवसेना नेते सतिश सावंत यांनी आज एम डी के टोल कंपनीचे व्यवस्थापक अमोल कळसकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांच्यासह ओसरगाव सरपंच प्रमोद कावले तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.