काही महिन्यांपूर्वी झालेला वाद पुन्हा उफाळून आला. आणि रागाच्या भरात एकाने धारधार हत्याराने तब्बल ५ जणावर सपासप वार करून त्यांना रक्तबंबाळ केले. ही घटना सोमवारी रात्री शहरातील बहादूरशेख नाका परिसरात घडली. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून युवराज शंकर पवार (वय ३३, रा. खेर्डी दातेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. तर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात चिपळूण पोलीस स्थानकातून पत्रकारांना देण्यात आलेली माहिती तसेच घटनास्थळावरून मि ळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी युवराज पवार व फिर्यादी संकेश विश्वास उतेकर यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते. त्यामुळे दोघांच्या मनात राग खदखदत होता. सोमवारी रात्री संकेश उतेकर हा आपल्या मि त्राबरोबर बहादूरशेख नाका येथे एका माडी केंद्रावर बसला होता. त्याचवेळी युवराज पवार हा देखील त्याठिकाणी आला. मागील. घटनेबद्दल मला तुझ्याशी बोलायचे आहे. जरा ऐकून घे, असे त्याने संकेशला सांगितले, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
युवराज संतापला – तुझ्याकडून मला काहीही ऐकायचे नाही. मी निघालो, असे म्हणत संकेश तेथून बाहेर पडू लागला. आपले म्हणणे ऐकून घेत नाही याचा भयंकर राग युवराजला आला. त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. जोरदार बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात युवराज ने धारधार हत्याराने सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्याने संकेश उतेकर यांच्यासह त्याच्या मित्रावर देखील हल्ला चढवला. त्याचवेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मित्रावर देखील त्याने वार करून रक्तबंबाळ केले. भर रस्त्यात घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला होता.
५ जण जखमी – संशयित आरोपी युवराजने धारधार हत्याराने चढवलेल्या हल्लूयात संकेश शंकर उतेकर (२५), श्रीराम धोंडू झगडे (२६), सागर चिंदरकर (२४), प्रकाश राजेंद्र भगवानराव मोरे (३९) आणि तन्वीर खेरटकर हे ५ जण जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात जखमी झालेला तन्वीर खेरटकर हा भांडण सोडवण्यासाठी व समजूत घालण्यासाठी आला होता. विनाकारण तो ही या भानगडीत ओढला गेला आणि जखमी देखील झाला आहे.
याप्रकरणी संकेश उतेकर याने फिर्याद दिली असून त्यानुसार चिपळूण पोलिसांनी भारतीय कायदा ११८(१) व ३५२ नुसार संशयित आरोपी युवराज पवार याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला तात्काळ ताब्यात घेतले असल्याचे पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. संशयित आरोपी आणि फिर्यादी हे दोघही खेर्डी येथील असून या दोघांमध्ये यापूर्वी नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला होता.? तसेच सोमवारी रात्रौ नेमके काय घडले ?या बाबत अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.