तालुक्यातील वीर, नारदखेरकी व निव्हळ येथे विनापरवाना बेकायदा जंगलतोड करण्यात आली. या ३ ठिकाणी मिळून ३८१ झाडांची कत्तल करण्यात आली. याप्रकरणी वनविभागाने अवैध वृक्षतोडीविरोधात संबंधितांवर धडक कारवाई सुरू केली आहे. तीनही ठिकाणचे लाकूडसाठे जप्त केले. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम १९६४ नुसार कारवाई सुरू केली आहे. तालुक्यातील मौजे वीर येथील मालकी सर्व्हे नं. १७२९ मध्ये विनापरवाना वृक्षतोड आढळून आल्याने कारवाई सुरू केली आहे. या ठिकाणी मनाई जातीचे एकूण १४५ झाडे व बिगरमनाई प्रजातीमधील १०८ अशी एकूण २५३ झाडे तोड केल्याचे आढळले आहे.
या झाडापासून मनाई व बिगरमनाई जळावू किटा २२८ घनमीटर आणि इमारती अनगड नग २१३.७४० घनमीटर इतका लाकूडमाल जप्त केला आहे. जप्त केलेला लाकूड माल संरक्षणाकरिता तात्पुरत्या स्वरूपात पंचासमक्ष महादेव हरी वीरकर यांच्या ताब्यात देण्यात आला. या अवैध वृक्षतोडीबाबत संबंधिताविरुद्ध वनविभागामार्फत दंडात्मक कारवाई केली. जप्त माल सरकारजमा करण्याचे आदेश होऊन त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. मौजे नारदखेरकी येथील मालकी सर्व्हे गट नं. ११८८ येथील पाहणीमध्येसुद्धा मनाई वृक्ष १० व बिगरमनाई ९५ अशी एकूण १०५ झाडांची तोड झालेली आहे. या झाडांपासून मनाई, बिगरमनाई जळाऊ किटा ८९.९०० घनमीटर व आकेशिया अनगड नग १०० व ५.६३० घनमीटर एवढा मिळून आला आहे. हे लाकूडमाल
जप्त करून तात्पुरत्या स्वरूपात पंचासमक्ष शिवाजी अंबाजी यादव यांच्या ताब्यात ठेवला आहे. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध वनविभागामार्फत दंडआदेश निर्गमित करण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू आहे. मौजे निव्हळ गावातील दशरथ नारायण कदम यांच्या मालकी क्षेत्रात मनाई जातीची २३ झाडे विनापरवाना तोडून त्यापासून इमारती इमारती नग १२/१.०६६ व जळाऊ किटा ४.८६८ इतका लाकूडमाल तयार केला आहे. ही वृक्षतोड दशरथ दत्ताराम जाधव (रा. रावळगाव) यांनी केली. विनापरवाना आडतोडीचा गुन्हा त्यांनी कबूल केला आहे.
परवानगी घेऊन तोड – मौजे निर्व्याळ गावचे सरपंच व पोलिसपाटील यांच्यासमवेत गावपरिसराची फिरती केली असता रमेश सदाशिव सावंत (रा. निर्व्याळ) यांच्या मालकी क्षेत्रामध्ये तोड आढळून आली; परंतु त्यांनी सागाची ४० झाडे तोडण्याबाबत परवानगी घेऊन तोड केली असल्याचे दिसून आले.