रद्द करा…. रद्द करा… डम्पिंग ग्राउंड रद्द करा…. कोण म्हणतंय करणार नाही….. केल्याशिवाय राहणार नाही…. डम्पिंग ग्राउंड हद्दपार झालाच पाहिजे…. अशा घोषणांनी कोत्रेवाडी नागरिकांनी लांजा शहर परिसर मंगळवारी दणाणून सोडला. निमित्त होते ते नगरपंचायतीच्यावतीने जोर जबरदस्तीने राबविण्यात येत असलेल्या डंपिंग ग्राउंड विरोधात कोत्रेवाडी नागरिक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने छेडण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाचे. दरम्यान कोत्रेवाडी येथे वाडीवस्तीलगत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प राबवून येथील नागरिकांना देशोधडीला लावण्याचा लांजा नगरपंचायतीचा प्रयत्न असून तो हाणून पाडला जाईल असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी दिला आहे.
या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उप जिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, महिला उपजिल्हा संघटिका उल्का विश्वासराव, लांजा तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, शिवसहकार सेनेचे जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, पक्षाचे नेते भाई विचारे, जिल्हा सरचिटणीस परवेश घारे, महिला तालुका संघटिका पूर्वा मुळ्ये, युवा सेनेचे तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के, माजी शिवसेना शहरप्रमुख नितीन शेट्ये, दिलीप मुजावर, पप्पू मुळ्ये, माजी. नगरसेवक लहू कांबळे, विभागप्रमुख राजू सुर्वे, विश्वास मांडवकर, पुनस सरपंच संतोष लिंगायत, सचिन लिंगायत, बाबू गुरव यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी विभाग प्रमुख , शाखाप्रमुख, शिवसैनिक त त्याचप्रमाणे कोत्रेवाडीतील नागरिक, महिलावर्ग, पुरुषवर्ग आणि युवक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस पक्षाचे लांजा तालुका अध्यक्ष राजेश राणे, प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, माजी सचिव महेश सप्रे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे बाबा धावणे हे देखील उपस्थित होते.
४ वर्षापासून आंदोलन – लांजा नगरपंचायतीच्यावतीने शहरातील कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. कोणत्याही शासकीय निकषात न बसणारी अशी ही जागा असताना देखील नगरपंचायतीकडून आचारसंहितेच्या काळात या डम्पिंग ग्राउंडसाठी जागा खरेदी करण्यात आली होती. हा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प अगदी लोक वस्तीलगत म्हणजे लोक वस्तीपासून साधारणतः २०० मीटरवर राबविला जांत असल्याने याचा त्रास हा भविष्यात येथील वाडीवस्तीला होवून होणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्यावतीने गेल्या ४ वर्षांपासून या डम्पिंग ग्राउंड विरोधात आंदोलन पुकारले आहे.
प्रकल्प रेटण्याचे प्रयत्न – याबाबत सातत्याने नागरिकांकडून आंदोलने, उपोषण केली जात आहेत. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, लांजा तहसील, पोलीस प्रशासन यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधींना निवेदने देखील सादर केलेली आहेत. मात्र तरीदेखील नगरपंचायतीकडून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
लाक्षणिक उपोषण – या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्यावतीने डम्पिंग ग्राउंड हटावसाठी मंगळवारी ८ जुलै रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. या पार्श्वभूमीवर बोलताना उप जिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी सांगितले की, आम्ही कोत्रेवाडी नागरिकांच्या पाठीशी ठामपणे आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिकवणीनुसार आम्ही कोत्रेवाडी नागरिकांच्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होवू देणार नाही. लांजा नगरपंचायतीकडून या कोत्रेवाडी ग्रामस्थांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यांचा हा कुटील डाव आम्ही कदापि सहन करणार नाही आणि तो डाव आम्ही आणून पडल्याशिवाय राहणार नाही. नगरपंचायत जोर जबरदस्तीने हा प्रकल्प राबवू पाहत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी एकजुटीने कोत्रेवाडी नागरिकांच्या लढ्यात सहभागी होणार आहोत, असा इशारा ठाकरे गटाच्यावतीने. यावेळी प्रशासनाला देण्यात आला.