कोकणामध्ये विविध ठिकाणी महामार्गाच्या कडेला अनेक लहान मोठे उद्योग धंदे, चहा, वडापाव टपरी सारखे व्यवसाय स्थानिक ग्रामस्थ करतात. काहींची चव हि एवढी अप्रतिम असते कि, त्या भागामध्ये गेल्यावर आपोआपच पाऊले त्याच दुकानाकडे अथवा टपरीकडे वळतात. त्यामुळे ठराविक टपरीवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येते. त्यामुळे इतर छोट्या दुकानदारांचा व्यवसाय तेवढा तेजीत चालत नसल्याने काहीवेळा वादाची परिस्थिती निर्माण होते.
राजापूर तालुक्यातील हातीवले येथील टपरीचालकाचा चहाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालतो याचा राग मनात धरून १० ते १५ जणांनी टपरीवरील कामगाराला मारहाण केली. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी घडली असून, संबंधित मारहाण करणाऱ्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील काढून घेवून गेलेत. त्याप्रमाणे गळ्यातील सोनसाखळी आणि पँटच्या खिशातील ८ हजार ५० रुपये देखील कुठेतरी हरवून त्याचे आर्थिक नुकसान केले.
सदरची फिर्याद सुनीलकुमार यादव वय ३०, हातिवले टोलनाका, राजापूर याने संबंधित मारेकर्यांच्या विरोधात पोलिसांत दिली. त्यानुसार संशयित म्हणून किरण मणचेकर वय ४६, रा. हातिवले याच्यासह अन्य १५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनीलकुमार यादव हा हातिवले टोलनाक्याजवळ लालमन भैरवदीन यादव यांच्या मालकीच्या फर्निचर वर्कशॉप तसेच चहाची टपरी येथे काम करतो. त्याचा चहाचा व्यवसाय जोरदार चालतो. त्याचा राग येवून मणचेकर याने १० ते १५ जणांना सोबत घेवून सुनीलकुमार यादव याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.