भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे तीन दिवसांपूर्वीच त्यांना उपचाराकरिता, दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, आज सकाळपासून सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांच्या बाबतची निधनाची वाईट बातमी सर्वत्र पसरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रूग्णालयामधील एका रुग्णाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन ते मनमोहन सिंह असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, याबाबत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने खुलासा केला आहे कि, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोचा मनमोहन सिंह यांच्याशी काहीही संबंध नाही. केवळ ताप आल्यामुळे बुधवारी मनमोहन सिंह यांना एम्स रुग्णालयात दाखल केले असून, सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.
एप्रिल महिन्यामध्ये मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार देखील सुरू होते. ताप असल्याने त्यांची त्वरित कोरोनाची चाचणी केली गेली. त्यावेळी त्यांचे रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनावर सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या मात केली. परंतु, त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. मनमोहन सिंग लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांसह अनेक समर्थकही प्रार्थना करत आहेत.
आज दुपारपासून सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याच्या अफवेला एम्सच्या अधिकाऱ्यांनी, रुग्णालयातील एका रुग्णाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंह असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोसोबत मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याचा उल्लेल्ख केला आहे. या सर्व गोष्टी असत्य आहेत, हे सांगून पूर्णविराम दिला आहे. मनमोहन सिंह यांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे अहवालामध्ये आढळून आले आहे. परंतु, आत्ता त्यांच्या प्रकृतीत योग्य तर्हेने सुधारणा होत असल्याची एम्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
त्याचप्रमाणे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनीही नुकतीच रुग्णालयात जाऊन मनमोहन सिंह यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांशी चर्चा देखील केली. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली मनमोहन सिंह यांच्या निधनाची ती बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.