कोकणात शेती, मासेमारी आणि फळप्रक्रिया उद्योग हे मोठ्या प्रमाणात चालतात. शेतीमध्ये सुद्धा आता पारंपारिक शेती पद्धतीची जागा आधुनिकतेने घेतलेली दिसत आहेत. अद्ययावत यंत्रणांमुळे शेतकरी सुद्धा नव्या पद्धती शिकून घेत असून, शेतीचे जास्तीत जास्त उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे अगदी माती परीक्षणापासून ते ड्रोनच्या वापराने बियाणे आणि फवारणी करण्यापर्यंत शेतकरी हायटेक बनत आहे.
काळानुसार शेतीमध्ये आवश्यक बदल करणे आवश्यक आहे. आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकर्यांना आता थेट शिवारातून अवघ्या काही तासामध्येच माती परीक्षण करता येणार आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला ही सुविधा उपलब्ध झाली असून हंगामाला सुरुवात करण्यासाठी माती परीक्षणाच्या सुविधेचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
कृषी वैज्ञानिकांच्या मते पिकाच्या भरगोस उत्पादनासाठी शेतजमिनीचा पोत चांगला असणे गरजेचे आहे. त्यामुळे पिकाच्या लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. माती परीक्षण करून जमिनीत कमतरता असलेल्या घटकांची पूर्तता करून पिकाचे चांगले उत्पादन वाढवता येऊ शकते. परिणामी शेतकर्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होते. अनेक शेतकरी बांधवांना माती परीक्षणाचे महत्त्व माहिती असते, पण त्यासाठी करावा लागणारा आटापिटा लक्षात घेऊन, शेतकरी बांधव माती परीक्षण करण्यासाठी कंटाळा करताना दिसतात.
त्यामुळे जुन्या कंटाळवाण्या पद्धतीला छेद देत आता माती परीक्षण अवघ्या काही तासात करता येणे शक्य आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीची सुविधा जी, शेतकर्यांना थेट शिवारातून माती परीक्षण करण्याची उपलब्ध करण्यात आली आहे. अवघ्या काही वेळामध्येच मोबाईलद्वारे माती परीक्षणाची सुविधा करण्यात आली आहे. यासाठी शेतकर्यांनी पोर्टेबल किटद्वारे माती परीक्षण करण्यासाठी पाच ग्रॅम माती परीक्षानळी सारख्या दिसणार्या यंत्रात टाकावी लागणार आहे. या यंत्राला ब्लू टूथ कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली गेली आहे. या यंत्राला ब्लू टूथ द्वारे आपल्या मोबाईलशी कनेक्ट केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात परीक्षणाचा अहवाल प्राप्त होणार आहे.