सोशल मिडीयाचा वापर अधिक प्रमाणात सर्वत्रच होत असल्याने, जसे त्याचे दुष्परिणाम आहेत तसेच त्याचे अनेक वेळा फायदे देखील झालेले निदर्शनास आले आहेत. अनेक वेळा बेपत्ता लोकांचा शोध सोशल मिडीयाच्या माध्यमातून लागला आहे. त्यामुळे अनेक वेळा पोलीस यंत्रणा देखील अशा प्रकारच्या मदतीचे सहाय्य घेताना दिसते. अशीच एक घटना रत्नागिरी मध्ये घडली असून, अखेर त्या बेपत्ता महिलेची माहिती सोशल मिडीयाच्या आधारेच मिळाली आहे.
चार पाच दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सौंदरे गावातून महिला सरपंच अचानक बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. सौंदरेच्या महिला सरपंच बेपत्ता झाल्याची माहिती समजताच सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली. त्या सरपंच महिलेचा फोटो आणि वर्णन महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांत पोचविण्यात आले.
तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातूनही चौकशी सुरू केली. सोशल मिडियातून आलेली माहिती पाहून रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आश्रमात आश्रयाला थांबलेल्या सरपंच महिलेची माहिती तेथील काहींनी दापोली पोलिसांना दिली. त्यांनी संबंधित वर्णनाची माहिती आश्रमात असल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे जावून पाहणी केली व त्या सौंदरे गावच्या सरपंच असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना रत्नागिरी तालुक्यातील पावस येथल आश्रमातून पोलिसांनी ताब्यात घेवून कुटुंबियांच्या स्वाधीन केले. त्यांच्या गायब होण्याचे कारण मात्र कळू शकले नाही. दापोली पोलिसांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून त्यांना सुखरूप गावी आणले. ही सर्व प्रक्रिया पोलिसांनी केवळ ४८ तासामध्ये पूर्ण केली आहे.

