या योजनेच्या अर्ज नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www. igmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेची सविस्तर माहिती या विभागाच्या www. igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशने परिपत्रक मुद्रांक अभय योजना या सदराखाली नागरिकांसाठी उपलब्ध आहे. राज्य शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत संपूर्ण राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्क अभय योजनेत कमी स्टॅम्प ड्युटी भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक शुल्कात आणि दंडामध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे.
मुद्रांक शुल्क अभय योजना दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार असून, पहिला टप्पा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर दुसरा टप्पा हा १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ असा असले. काही कारणास्तव पहिल्या टप्प्यात सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर दुसऱ्या टप्प्यातही सवलतीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे; परंतु, नक्त लाभ हा कमी प्रमाणात मिळेल. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत दस्त हा कोणत्याही रक्कमेच्या स्टॅम्पपेपरवर निष्पादित झालेला असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय अर्जदाराला अर्ज करता येणार नाही.
एखाद्या प्रकरणी पूर्वीच डिमांड नोटीस देण्यात आली असेल तर त्या प्रकरणी मुद्रांक शुल्काचे निर्धारण करण्याची गरज नाही. मालमत्तेच्या हस्तांतरणावरील कमी भरलेले मुद्रांक शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा केले नाही तर अशा लोकांच्या मालमत्तेवर मुद्रांक कायद्याच्या कलम ४६ नुसार टाच आणून त्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करून शासनाच्या चुकवलेल्या मुद्रांक शुल्काची संबंधितांकडून सक्तीने वसुली करण्याच्या सूचनादेखील शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. ही कारवाई टाळण्यासाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.