जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांपासून पावसाळ्यात विविध नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढत आहे. डोंगराळ भाग असल्याने काही ठिकाणी काही वर्षांपासून दरड कोसळण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. आतापर्यंतच्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करता जिल्ह्यात संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये २११ गावांचा समावेश आहे. या गावांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यात भूस्खलनाचे प्रकार वाढले आहेत. दोन ते तीन वर्षांपूर्वीही खेडमध्ये घरावर डोंगर कोसळून कुटुंबच्या कुटुंबे गाडली गेली होती. दिवसेंदिवस या नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे. त्यात चिपळूणला आलेल्या महापुरामुळे जिल्हा प्रशासन आणि शासनाला बरच काही शिकता आले.
आता या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी गेल्या दोन वर्षांमध्ये विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आता नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाच्यादृष्टीने पूर्ण तयार झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या तैनात ठेवल्या जातात. या पावसाळ्यातही एनडीआरएफच्या तुकड्या जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी तैनात राहणार आहेत. तशी तयारी प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यात ३०० आपदामित्रांची फळी – रत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात ३०० आपदामित्र आणि सखी यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीमध्ये या आपदामित्रांकडून मदतकार्य होणार आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्यादृष्टीने दरडप्रवण भागातील नागरिकांनाही स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.