दोन वर्षाच्या महाभयंकर कोरोना काळानंतर, दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन स्वरूपामध्ये घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी बराच काळ परीक्षा ऑफलाईन होणार कि ऑनलाईन यावर चर्चा मसलत सुरु होती. अखेर राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा शासनाकडून निर्णय झाला आहे. त्यासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अनेक सूट आणि सुविधा दिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये अजून एका सवलतीची घोषणा आता करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमितपणे ऑफलाईन शिक्षण होऊ शकले नाही, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन २०२१-२२ करता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. त्यामुळे एक प्रकारे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हि खुशखबर आहे.