मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील शहरी भागातील रस्ते गुळगुळीत करण्याचे काम ऐरणीवर सुरु होते. त्यानंतर सुरु झालेल्या पावसामुळे मग सर्व कामे थांबवण्यात आली. त्यामध्ये रस्त्यावरील गतीरोधकावर पांढरे पट्टे मारण्याचे काम प्रलंबित आहे. त्यासाठी आता पावसाळा ऋतू सरला असून, रस्त्यातील अनेक गतिरोधक दृष्टीस पडत नसल्याने, अपघात घडण्याच्या घटना देखील घडतात.
शहरातील मुख्य रस्त्यांवर गतिरोधक, बाजूपट्टी, दुभाजक, झेब्रा क्रॉसिंग आणि दिशादर्शक रेषा अद्याप काढलेले किंवा पांढऱ्या रंगाने रंगवलेले दिसत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. मागील काही दिवसात रत्नागिरी शहरात गतिरोधक लक्षात न आल्याने एक मोठा अपघात मारूती मंदिर, के. सी. जैननगर परिसरात घडला होता; परंतु असे अपघात होऊ नयेत यासाठी रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी भाजप भटके विमुक्त जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश आखाडे यांनी केली आहे.
पावसाळ्यापूर्वी नवीन रस्ते केल्यामुळे कदाचित पावसाच्या ऋतूमध्ये हे पट्टे मारणे शक्य झाले नव्हते ; मात्र आता पावसाचा कालावधी निघून गेला असल्याने तातडीने रत्नागिरी शहरातील सर्व गतिरोधक, बाजूपट्टी पांढऱ्या रंगाने दर्शवणे आवश्यक आहे. संबंधित विभागाला याबाबत सूचना करून हे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी मागणी नीलेश आखाडे यांनी जिल्हाधिकारी व रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. जेणेकरून या अपघातांची मालिका बंद होईल आणि आणि नागरिकांना देखील वाहतूक करणे सोपे होईल. अनेक वेळा मुलांना देखील साईडपट्टीचा अंदाज न आल्याने सायकलचे देखील अपघात घडून येतात.