आता रत्नागिरी नगरपालिकेत राज्यातील निर्णयानुसार महायुती होईल असे बोलले जाते. जिल्हयाचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे संबंध अतिशय चांगले असल्याचे यापूर्वी अनेक घटनांमधून दिसून आले आहे. रत्नागिरी नगरपालिकेत भाजपाचे ठराविक प्रभाग वगळता अन्यत्र तितकी ताकद नाही. त्यामुळे नगराध्यक्षपद ‘शिवसेनेच्या वाट्याला जाईल आणि मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीत रत्नागिरीचा विचार करता ६० % सेना, ३५% भाजपा व ५ % राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व आरपीआय असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचे समजते. तर उपनगराध्यक्षपद भाजपला देण्यात येईल. रत्नागिरी नगरपालिकेचे ३२ नगरसेवक आहेत. त्यामध्ये नगराध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार किंवा गेले तर भाजपला १० पेक्षा अधिक नगरसेवकांच्या जागा द्याव्या लागतील, असे समजते. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला १ किंवा २ जागा मिळतील, असे समजते.
आरपीआयला एखाद दुसरी जागा देण्यात येईल, अशी चर्चा सुरू आहे. आता भाजपाचे विद्यमान ५ नगरसेवक आहेत. त्यांना ३ ते ४अधिक जागा जर. देण्यात आल्या तर त्या कोणत्या प्रभागात देणार याबाबत चर्चा सुरू आहे. शहरातील नव्याने असलेल्या प्रभाग १५ मध्ये भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे या इच्छुक आहेत, त्यामुळे ही जागा त्यांना ही जागा हवी आहे. तर निलेश आखाडे प्रभाग क्र. ६ मध्ये इच्छुक आहेत. प्रभाग क्र. ३ मध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या पत्नी इच्छुक असल्याचे बोलले जाते. या जागांसह अन्य काही प्रभागात भाजपाला जागा मिळतील असे बोलले जात आहे. तर अल्पसंख्यांकबहुल असलेल्या प्रभागामध्ये २ ते ३ जागा राष्ट्रवादीला दिल्या जातील, अशी चर्चा आहे.
नगराध्यक्षपदासाठीची चुरस – रत्नागिरीचे नगराध्यक्षपद महिलांसाठी सर्वसाधारण) आरक्षित झाल्याने शिवसेनेत अनेक इच्छुक आहेत. यामध्ये सौ. शिल्पा सुर्वे, माजी नगराध्यक्षा सौ. राजेश्वरी शेट्ये, सौ. स्मितल पावसकर यांची नावे आहेत. यातील कोणाला उमेदवारी मिळते हे पाहावे लागेल.
महाविकास आघाडीचे काय ? – हे महायुत्तीचे झाले. महाविकास आघाडीत जागावाटप कसे होते, कोण कोण इच्छुक आहेत, याची देखील चर्चा सुरू आहे. बहुधा येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही इच्छुक आहेत. सौ. शिवानी मिहिर माने यांचे नाव ठाकरे गटाकडून चर्चेत आहे. तर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच्या सौभाग्यवती सौ. हिमानी कीर यांचे नाव राष्ट्रवादीच्या गोटातून पुढे येत आहे. सौ. शिवानी माने या माजी आमदार बाळ माने यांच्या सूनबाई आहेत. तर भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे.