मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहरातील उड्डाणपुलाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. पावसाळा सुरू झाला तरीही काम करणाऱ्या ठेकेदाराकडून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात न आल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी शहरातील नागरिक तसेच महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत लांजा येथे बैठक घेवून शहरातील कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच ठेकेदाराला आवश्यक त्या सूचनाही दिल्या. गेले अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरणाचे काम आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
मात्र, शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. पावसाळा सुरू झाला तरी या कामाला गती मिळत नव्हती. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत शहरातील नागरिकांकडून दोन दिवसांपूर्वी आवाज उठविण्यात आला होता. उड्डाणपुलाच्या बाजूने जाणारे सेवा मार्ग तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणारी गटारे नसल्यामुळे शहरातील महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याची दखल घेत लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी महामार्गाचे अधिकारी व शहरातील नागरिक यांच्यासह लांजा येथे बैठक घेतली. त्यानंतर महामार्गाचे अधिकारी व नागरिकासह शहरातील महामार्गाची पाहणी केली. यावेळी आमदार राजन साळवी यांनी महामार्गावर काम चालू असलेल्या ठिकाणी जावून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना प्रत्यक्षात दाखवून तातडीने त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख नागेश कुरुप, लांजा तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, नगरसेवक स्वरूप गुरव, लांजा तालुका खरेदी-विक्री संचालक राहुल शिंदे, उपशहरप्रमुख बाबू गुरव, वैभव जोईल, पप्पू मुळे, नगरसेवेक राजेश हळदणकर, माजी सरपंच राजेश राणे, बाबा धावणे, दाजी गडहिरे, विशाल लिंगायत, व्यापारी संघटना पदाधिकारी मिलिंद उपशेट्ये, प्रभाकर शेट्ये, नरेश पटेल, मंदार भिंगार्डे, महामार्ग विभागाचे अधिकारी श्री. कुलकर्णी व अन्य – अधिकारी त्याचबरोबर महामार्गाचे ठेकेदार, प्रतिनिधी तसेच शिवसेना शहर पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.