सावर्डे येथील दोन कातभट्ट्या बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले असताना अद्यापही कातभट्ट्या सुरू आहेत. असा आरोप करत तात्काळ कातभट्टी बंद आदेशाची अमलबजवणी व्हावी यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळ पासून प्रांतकार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरू होते. सावर्डे येथील दोन कात भट्ट्यांचे घाणेरडे दूषित पाणी थेट कापशी नदीत मिसळत आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी, बोरवेलमध्ये हे पाणी मिसळून ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.
तसेच परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरली आहे. अनेक शेतामध्ये हे पाणी जाऊन शेती उद्धवस्त होत आहे. गेले कित्येक वर्षाचा हा त्रास आहे, असे आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांचा गंभीर आरोप आहे. गेले अनेक वर्षे येथील रहिवाशी त्याविरोधात लढा देत आहेत. प्रशासन कारवाई करताना कात भट्टी बंद करण्याचे आदेश देतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान दोन महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी थेट आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी माजी खासदार भाजप नेते निलेश राणे यांनी या संदर्भात दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच डोस दिले होते. त्यावेळी कारवाई केली जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार १३ ऑगस्ट रोजी महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन्ही कात भट्ट्या तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच कात भट्ट्यांचा वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते.
परंतु त्या आदेशाला केराची टोपली दाखवत. दोन्ही कात भट्ट्या अद्याप सुरू असून दूषित पाणी बिनदिक्कतपणे कापशी नदीत सोडले जात आहे. असा आरोप करत ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनी गुरुवारी सकाळपासून चिपळूण प्रांताधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या उपोषणस्थळी अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. परंतु प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी मात्र उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली नाही. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत हे उप- ोषण सुरू होते.