एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. आदोलनामुळे आज (ता. ४) रत्नागिरी विभागातील एकूण ३ हजार फेऱ्या रद्द झाल्या. दापोली, गुहागर, खेड आगारासह लांजा आगारातही कडकडीत बंद होता. मात्र, अन्य आगारात संमिश्र प्रतिसाद होता. या आंदोलनामुळे एसटीची ७० टक्के वाहतूक बंद होती. गेल्या दोन दिवसांत एसटीचे ५६ लाखांचे नुकसान झाले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत कृती समितीच्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संप सुरू आहे. काल दापोली, गुहागर, खेड आगारात कडकडीत बंद होता. आज लांजा आगारातील कर्मचारी संपात उतरल्याने लांजा आगाराही बंद होता.
या चारही आगारातील प्रवासी, नोकरदार, विद्याथ्यांचे हाल झाले. गणेशोत्सव तोंडावर असल्याने मंगळवारी मुंबईतून ६०० गाड्या कोकणात येणार होत्या; परंतु मराठवाडा, विदर्भामध्ये आंदोलन तीव्र असल्याने गाड्या घेऊन चालक मुंबईत दाखल न झाल्याने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. केवळ १३० गाड्या सोडण्यात एसटी प्रशासनाला यश आले. आज कोकणात येणाऱ्या तीन हजार एसटी गाड्यांचे आरक्षण आहे; परंतु आंदोलन सुरू असल्याने महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. चाकरमान्यांनी ६० दिवस आधी कोकणात येण्याचे आरक्षण केले आहे. मात्र, गाड्या व चालक उपलब्ध नसल्यामुळे प्रशासन संकटात आहे.
चाकरमान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी विभागातून दैनंदिन ७५० बसद्वारे ४ हजार ५०० फेऱ्यांद्वारे दररोज दोन ते अडीच लाख किलोमीटर प्रवासी वाहतूक करण्यात येते. एसटी कर्मचारी संपामुळे पहिल्या दिवशी मंगळवारी १८०० फेऱ्यांची ४० हजार किमीची वाहतूक बंद राहिल्याने १६ लाखांचे आर्थिक नुकसान झाले होते. आज तीन हजार फेऱ्या रद्द झाल्या. विभागाचे दिवसभरात ४० लाखांचे नुकसान झाले आहे.
तोडगा शक्य – आज सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. बैठकीत कर्मचारी मागण्यांबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे, अन्यथा आंदोलन तीव्र झाल्यास ऐन गणेशोत्सव सणासाठी गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होणार आहे.