ज्येष्ठ नागरिक लालपरीतून प्रवास करीत असताना एसटी महामंडळाच्या वतीने त्यांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली होती. यात आधारकार्ड, मतदानकार्ड ऐवजी एसटीचे स्मार्टकार्ड देण्याची योजना सुरू केली. पंरतु या योजनेला उतरती कळा लागत असून कित्येक स्मार्ट कार्ड एसटी आगारातच पडून आहेत. जिल्ह्यात स्मार्टकार्ड योजना बंद झाली असून आता सवलत घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आधारकार्ड दाखवावे लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे जुनेच कागदपत्रे दाखवून सवलतधारकांना प्रवास करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या वतीने पूर्वी ज्येष्ठांना तहसील कार्यालयातून मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाखल्याच्या आधार एसटीची सवलत मिळत असे मात्र त्यांना वयाचा पुराव्यासाठी आधारकार्ड, मतदानकार्ड बंधनकारक करण्यात आले होते. यानंतर एसटी महामंडळाच्या सवलतीत प्रवास करणाऱ्यांसाठी मागील ९ वर्षापूर्वी स्मार्टकार्ड पध्दत सुरू केली.
त्याचबरोबर शाळा व महाविद्यालयातील विद्याथ्यर्थ्यांना एसटीची सवलत दिली जाते. तसेच विशेष प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही स्मार्टकार्ड पध्दत सुरू केली होती. तसेच शाळा, महाविद्यालयातून प्रवास करणाऱ्या अन्य पासधारकांना प्रवाशांना देखील स्मार्टकार्ड देण्यास सुरूवात झाली. मात्र मागील दोन वर्षापासून ही स्मार्ट कार्ड योजनाच बंद करण्यात आली आहे, तर आता जुन्याच पध्दतीने ज्येष्ठांना आधारकार्ड दाखवून सवलत दिली जातेय. शाळा, महाविद्यालय, विशेष सवलत घेणार्या प्रवाशांना कागदी पासेस देण्यात येत आहेत.