सोमवारी एसटी कामगार कृती समितीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत कामगार कृती संघटनेने वकील गुणरत्न सदावर्ते यांना हटवण्याचा निर्णय घेतला. एसटी कामगार संघटनेने एसटी कर्मचार्यांच्या विलीनीकरणाची न्यायालयीन लढाई लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांची एक प्रकारे हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी न्यायालयीन लढाईसाठी कर्मचाऱ्यांची बाजू ठाण्याचे वकील सतीश पेंडसे हे मांडणार आहेत.
एसटी विलीनीकरणा संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आमच्यातर्फे आम्ही गुणरत्न सदावर्ते यांची नेमणूक केली होती. मात्र, आता आम्ही त्यांना पत्र देत त्यांची नेमणूक मागे घेत असून, आम्ही आता नव्या वकिलाची नेमणूक केलेली आहे. पुढील सुनावणीला नवीन वकील न्यायालयामध्ये हजर राहतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी दिली.
तसेच, सदावर्ते यांची नेमणूक करून फार मोठी चूक झाली. एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद पडण्याची वेळ आली आहे आणि ती वेळ केवळ सदवर्तेच्या अतातयीपणामुळे आली, अशी कबुली देखील गुजर यांनी दिली. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळे लोकांच्या डोक्यात नसतेच भ्रम निर्माण झाले होते. वकीलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये आहेत. ज्यांची नोकरी गेली आहे ती आता वाचणार आहे. एसटी टिकवण्याची जबाबदारी कर्मचार्यांची आहे, एसटी टिकेल तर आपण टिकू, असे कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे स्पष्ट म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा जनतेला त्रास न देता, कामावर हजर होण्याचे आवाहन केले.