गेल्या महिन्याभरापासून संपावर असलेल्या एस.टी. कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या गेल्या असून, त्यामध्ये विशेष ठरलेली मूळ वेतनातील पगारवाढ हि अखेर मंगळवारी जाहीर केलेल्या वेतनवाढीसह सुधारित वेतन खात्यामध्ये जमा झाले आहे. एस.टी. महामंडळाने १००% कामगारांचे वेतन ७ तारखेला केल्याचा दावा केला आहे.
संपात सामील नसलेल्या सुमारे १० हजारांहून अधिक कामगारांना वेतनवाढीसह १००% सुधारित वेतन मिळाले असून, ६० हजार कामगारांना वेतन कपातीचा सामना करावा लागला आहे. उरलेल्या २० हजारांहून अधिक कामगारांनी कामाचा एकही दिवस भरलेला नसल्याने त्यांची पगाराची पावती निघाली असली, तरी त्यांच्या खात्यावर शून्य रक्कम जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत एस.टी. महामंडळातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, महामंडळाने १०० % उपस्थित कामगारांचे वेतन मंगळवारी केले आहे.
एस.टी. महामंडळाचे सर्व २५० आगार हे ९ नोव्हेंबर नंतर संपात सामील झाले होते. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू असलेल्या आगारांमधील कार्यरत कामगारांना त्या आठवड्याभराचे वेतनही सुधारित वेतनानुसार दिले. संपापासून दूर असलेले यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचार्यांच्या खात्यात वेतनवाढीसह १०० टक्के पगार जमा करण्यात आला आहे. तर जे वीस हजार कामगार ऑक्टोबर महिन्यापासूनच संपावर असल्याने त्यांना वेतनवाढ मंजूर झाली असली, तरी नोव्हेंबर महिन्यातील शून्य उपस्थितीमुळे त्यांच्या खात्यावर शून्य पगार जमा झालेला आहे.
परिवहन मंत्री तसेच वरिष्ठ मंत्र्यांनी सुद्धा अनेकदा समजावून देखील अनेक कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहेत. काही केल्या ते सरकारमध्ये विलीनीकरण झाल्याची मागणी मान्य झाल्याशिवाय संपातून माघार घेण्यास तयार नाहीत. एक तर्हेने ते आर्थिक नुकसानीला सुद्धा सामोरे जात आहेत.