राज्यव्यापी सुरु असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या मागण्यासाठीचा संप अजूनही सुरूच आहे. संपामध्ये फुट पडावी आणि काहीही करून संप मिटावा यासाठी शासन आग्रही आहे. कर्मचार्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या असून, विलीनीकरणाच्या मागणीसाठी अजूनही संप सुरु आहे. एसटी विभागाने काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुद्धा केली, तर काहीची बदली घावून आणण्यात आली. तरीसुद्धा कर्मचारी आपल्या संपावरून माघार घेण्यास तयार नाहीत.
राजापूर आगारातील एसटीच्या संपात सहभागी झाल्यामुळे एकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याचा धसका सहन न झाल्याने राजापूर आगारातील ३५ वर्षाचे तरुण चालक व वाहक राकेश रमेश बांते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली आहे.
गेले काही दिवस राज्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अनेक कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत. महामंडळाने निलंबित करण्याची कारवाई सुरू केली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ऱाजापूर आगारातील सुमारे वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामध्ये राकेश रमेश बांते यांचा देखील समावेश होता. या महिन्याच्या दहा तारखेला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासुन ते तणावाखालीच होते, अशी माहिती एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली.
बुधवारी त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. मयत राकेश बांते हे मूळ भंडारा जिल्ह्यातील रहिवासी होते. गेली चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. अति प्रमाणात घेतलेल्या ताणामुळे शरीरावर दुष्परिणाम जाणवल्याने त्यांना जीव गमवावा लागला.