राज्यात दीड महिन्यापासून एसटीच्या कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. काही ठिकाणी अजूनही मागण्या जोपर्यत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संपावर ठाम राहण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे अनेक डेपोमधून वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. परिवहन मंत्र्यांच्या आवाहनाला सुद्धा झुगारून अनेक ठिकाणी बेमुदत संप सुरु आहे.
परिवहन मंत्री यांनी दिलेल्या शेवटच्या संधीनंतर रत्नागिरी एसटी विभागात काल ६०२ कर्मचारी कामावर हजर झाले होते. तर ७५ कर्मचारी अधिकृत रजेवर होते. त्यामुळे काम बंद आंदोलनकर्ते हळुहळू पुन्हा कामावर रूजू होवू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. तर दुसरी बाजू पाहता ३१०२ कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. येत्या २० तारखेला कोर्टाच्या तारखेनंतर निर्णय घेऊ, अशी भूमिका या कामगारानी घेतली आहे.
उपमुख्यमंत्री अजितपवार यांनी तर सज्जड इशाराच दिला आहे. कोणताही आंदोलन तुटेपर्यंत ताणू नये. ज्या मागण्यांसाठी संप केला गेला आहे, त्यातील पगारवाढ आम्ही केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कर्मचार्यांना पगारवाढ दिली. विलिनीकरणाबाबत समितीत जो निर्णय होईल त्यावर न्यायालय निर्णय देईल. जर तुम्ही हजर झाले नाहीत तर अत्यावश्यक सेवेतून कमी करण्यात येण्याची कारवाई करण्यात होणार आहे. त्यामुळे आम्ही जर नवीन भरती सुरू केली तर काय होईल? या शब्दात इशारा दिला आहे
हजर होणार्या कर्मचार्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय कर्मचारी साठ टक्के म्हणजे २५७ हजर झाले आहेत. कार्यशाळा १८१, चालक ७१, वाहक ६२ आणि चालक तथा वाहक ३१ हजर होते. यामुळे दैनंदिन फेर्यांची संख्याही हळुहळू वाढू लागली आहे. त्यामुळे आंदोलन तुटेपर्यंत ताणू नये असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.