राज्यातील एसटी कर्मचार्यांचा संप सुरूच असून न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात एसटी महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. राज्य शासन आणि न्यायालयाचा मनाई आदेश झुगारून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करत आज आझाद मैदानात मोर्चा काढून निदर्शने केली. एसटी महामंडळाकडूनही संपकरी कर्मचाऱयांवर कारवाई सुरूच असून आतापर्यंत राज्यातील ९१८ संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी मध्ये देखील काही कर्मचारी संपात सहभागी न झाल्याने, संपात सहभागी न होता सेवा देणाऱ्या चालक आणि वाहकाना थांबवून त्यांच्या गळ्यात हार घातल्याचे कारण दाखवून रत्नागिरीतील १७ एसटी कर्मचाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत एसटी प्रशासनाने निलंबन केले आहे.
राज्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हयातही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यात ९० टक्के पेक्षा जास्त कामगार, कर्मचारी सहभागी झाले आहेत. यावेळी कामगारांच्या भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. भाजप, मनसे अशा अनेक पक्षांनी त्यांना प्रत्यक्ष पाठींबा दर्शविला आहे.
जे चालक वाहक संपात सहभागी झाले नाहीत, अशा दोघांनी काही दिवसांपूर्वी राजापूर येथून रत्नागिरीत एसटी बस आणली होती. त्यांना वाटेत थांबवून काही संपकरी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गळ्यात हार घालून गांधीगिरी केली होती. त्या प्रकरणी एसटी प्रशासनाने संपात सहभागी १७ एसटी कर्मचाऱ्यांचे या प्रकरणी चौकशी होऊन पुढील आदेश येईपर्यंत निलंबन करून त्यांच्या वेतनात आणि महागाई भत्त्यात सुद्धा या कालावधीत ५० टक्के कमी केला आहे.
परिवहन मंत्री यांनी विविध प्रकारे समजावून देखील कर्मचारी मागण्या मान्य झाल्याशिवाय आपले बेमुदत आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने अखेर शासनाच्या नियमांचा अनादर केल्याने काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.