सणासुदीच्या दिवसात महाराष्ट्रातील गोरगरिब जनतेचे वाहतूकीचे एकमेव साधन असणारी लालपरी महागली आहे. २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या महिनाभरासाठी एसटीच्या प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. ही हंगामी भाडेवाढ असली तरी त्यामुळे गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे. एसटी महामंडळ तोट्यात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. अशा वेळी तोट्यात असलेल्या महामंडळाला अर्थसहाय्य करून सरकारने एसटीची सेवा सर्वसामान्यांना परवडेल अशा दरातच देणे अपेक्षित आहे.
मात्र गेली काही वर्षे सणासुदीच्या दिवसात एसटी महामंडळ आपल्या प्रवासी भाड्यात वाढ करत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीसाठी महामंडळाने शिवनेरी बस सेवा वगळता एसटीच्या अन्य गाड्यांच्या भाड्यामध्ये १० टक्के वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. गोरगरिब जनतेसाठी हा निर्णय हानिकारक असल्याने तो तातडीने रद्द करावा अशी मागणी कोकणवासीय प्रवासी संघाचे अध्यक्ष दिपक चव्हाण यांनी केली आहे.