25.8 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeChiplunपेव्हरब्लॉकने खड्डे भरण्यास प्रारंभ - गणेशोत्सवाची तयारी

पेव्हरब्लॉकने खड्डे भरण्यास प्रारंभ – गणेशोत्सवाची तयारी

मकिंगने भरलेले खड्डे पुन्हा उखडतात.

गणेशोत्सव पाच दिवसांवर येऊन ठेपला असून, चाकरमान्यांची पावले तयारीसाठी हळूहळू कोकणाकडे वळू लागली आहेत. पुढील दोन दिवसांपासून हे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी महामार्गावरील खड्डे पेव्हरब्लॉकने भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासह अपूर्ण असलेले काम युद्धपातळीवर हाती घेत आले आहे. पावसाळ्यात डांबराने खड्डे भरणे शक्य नाही. मकिंगने भरलेले खड्डे पुन्हा उखडतात. त्यावर पर्याय म्हणून पेव्हरब्लॉकने खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू आहे.

महामार्गावर जागोजागी पेव्हरब्लॉक आणून ठेवले आहेत. वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेऊन खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पळस्पे फाट्यापासून पोलादपूर, कशेडी घाटापर्यंत महामार्गाची पाहणी केली. तेव्हा त्यावेळी ठेकेदारांच्या गलथान कारभाराचा नमुना त्यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

उक्षीपर्यंतची एक लेन पूर्णत्वाकडे – रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी बोगदा ते आरवलीपर्यंतची दोन्ही लेन सुरू आहेत. आरवलीपासून संगमेश्वरपर्यंत जवळपास एक लेन पूर्ण झाली आहे. सावर्डे, वहाळफाटा, आरवली येथील जोडरस्ते, संगमेश्वरपर्यंत काही ठिकाणी असलेली डायव्हर्शनच्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात येत आहे. महामार्गावर संगमेश्वरपासून उक्षीपर्यंत एक लेनचा काही भाग सोडल्यास पूर्ण होत आली आहे. या ठिकाणचे डायव्हर्शन डांबरीकरणाने भरले जात आहे.

हातखंबा टॅब ते पाली रस्ता सुरक्षित – वांद्रीपासून निवळीपर्यंत आणि हातखंब्यात काही ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट आहे. रात्रीच्यावेळी धुळीमुळे डायव्हर्शन दिसूनही येत नाहीत. त्यामुळे या भागात अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. हातखंबा टॅब ते पालीपर्यंत बऱ्यापैकी रस्ता झाला आहे. पालीपासून पुढे दोनशे मीटरपर्यंत रस्त्याचे काम सुरू असून, पुढे काँक्रिटीकरण झाले आहे. आंजणारी घाट व त्यापुढील रस्ता बऱ्यापैकी झाला असल्याने प्रवास सुखकर होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular