मार्लेश्वर पर्यटनासाठी, महिपतगडासाठी तसेच मुरादपूर-मार्लेश्वर तिठा ते मारळ निनावे-आंबाघाट या रस्त्यासाठी लागणारा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत तालुक्यात आणला आहे. त्यामुळे आपल्या भागात पर्यटक येतील आणि येथील ग्रामस्थांना छोटे- मोठे उद्योग करून रोजगार मिळेल, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला. संगमेश्वर तालुक्यातील ओझरे जिल्हा परिषद गटातील कासारकोळवण येथील कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी कासारकोळवण ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करत आमदार निकम यांना पाठबळ देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार निकम म्हणाले, ‘रस्ते-पाखाड्या या होत राहतील.
लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, याला प्राधान्य दिले आहे. तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी छोटे-छोटे पाझर तलाव होणे महत्त्वाचे आहे. काही मंजूर झाले आहेत, काही मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. आपण कधीही कोणत्याही प्रकारचं राजकारण केलेले नाही किंवा सामाजिक विकासाचे भांडवलही केले नाही. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला समान न्याय देण्याचा प्रयत्न राहिला आहे. येथे राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देण्यात येते, हे सर्वांनाच माहीत आहे. सामाजिक कार्यात काम करणारे अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षात येत आहेत.
‘दरम्यान, आमदार निकम यांनी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांच्या गरजा लक्षात घेऊन तातडीने सोडवण्याचे आश्वासनही दिले. या वेळी सुनील तोरस्कर, सुजाता करंबेळे, प्रियांका तोरस्कर, सरिता करंबेळे, अनिता भोसले, सुलोचना अहीम, रेश्मा करंबेळे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकांच्या हाताला काम मिळावं – लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, याला प्राधान्य दिले आहे. तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी छोटे-छोटे पाझर तलाव होणे महत्त्वाचे आहे. काही मंजूर झाले आहेत, काही मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. आपण कधीही कोणत्याही प्रकारचं राजकारण केलेले नाही किंवा सामाजिक विकासाचे भांडवलही केले नाही, असे आमदार शेखर निकम यांनी यावेळी सांगितले.