तालुक्यातील नाटे ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा’ आणि ‘स्वच्छता अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानानंतर पूर्वी कचऱ्याचे साम्राज्य असलेल्या नाटे येथील जागेचे रूपडे पालटले आहे. स्वच्छ आणि सुंदर झालेल्या या जागेमध्ये आता ग्रामपंचायतीने आठवडा बाजार सुरू केला आहे. त्याचा फायदा परिसरातील गावांमधील लोकांना खरेदी-विक्रीसाठी होत आहे. व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या करातून ग्रामपंचायतीलाही हक्काचे उत्पन्न मिळत आहे. सरपंच संदीप बांदकर, उपसरपंच अन्वर धालवलकर आदींच्या हस्ते आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांच्या उपस्थितीमध्ये नाटे येथे आठवडा बाजाराचा शुभारंभ झाला.
या वेळी ग्रामपंचायत सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते मनोज आडविरकर, संदेश पाथरे, संतोष चव्हाण, मोगरेचे सरपंच बंडबे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रसाद मोदी, मुकेश बांदकर, पाटणकर आदी उपस्थित होते. नाटे गावामध्ये स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ आणि सुंदर गाव ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला ग्रामस्थांचेही ग्रामपंचायतीला सकारात्मक पाठबळ मिळत आहे. घंटागाडी फिरवून गावामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे संकलन केले जात आहे. त्या दृष्टीने योग्य पद्धतीने नियोजनही करण्यात आले आहे. शासनाचे माझी वसुंधरा अभियान राबवताना त्या अंतर्गत गावामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत.
एका सार्वजनिक ठिकाणी ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांकडून वर्षानुवर्षे कचरा टाकला जात आहे. त्यातून या ठिकाणी घाण आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. या ठिकाणची स्वच्छता करण्याचे आणि त्या जागेचा विधायक कामासाठी उपयोग करण्याचा निर्णय नाटे ग्रामपंचायतीने घेतला. त्यानुसार या ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली. त्याच ठिकाणी ग्रामपंचायतीने आठवड़ा बाजार सुरू करून त्या जागेचा सदुपयोगही केला.