कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकार बेफिकीर व बेजबाबदार असल्याचा ठपका ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव यांनी ठेवला आहे. सोमवारी दुपारी बहादूरशेख नाका येथील उड्डाणपूल कोसळल्यानंतर घटनास्थळी भेट देत पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकार व प्रशासनावर ताशेरे ओढले. खासदार राऊत म्हणाले, या पुलाच्या कामासंदर्भात तसेच एकूणच महामार्गाच्या कामाबाबत कोणीच गंभीर नाही. खरंतर ही हायवे अॅथोरिटी व बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. परंतु कोणताही अधिकारी व कर्मचारी तसेच नेमून सुपरव्हीजन करणारी यंत्रणा इथे फिरकत नव्हती.
यांच्यावरच खरे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. त्यासाठी आपण मंगळवारी (ता. १७) पोलिस ठाण्यात जाणार आहोत. या सर्व कामाचे प्रत्येक वेळी ऑडिट होणे गरजेचे होते. परंतु ऑडिट दूरच या कामामध्ये कोणताही दर्जा नाही हेच आता सिद्ध झाले आहे. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही, हे चिपळूणवासीयांचे सुदैवच म्हणावं लागेल. अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळेच हा प्रकार घडला आहे. जिल्ह्यात कुठेही व्यवस्थित काम झालेले नाही. तेच काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र व्यवस्थित करण्यात आले आहे, हाच मोठा एक विषय आहे, असेही या दोघांनी सांगितले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिष्टमंडळ राज्य सरकारला भेटेलच. परंतु केंद्र सरकारकडेही यावर पाठपुरावा करेल असेही राऊत यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता या मार्गाची पाहणी करावी, अशीही मागणी यावेळी दोघांनी केली. तर या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन मंत्र्यांचा राजीनामा आम्ही घेणार नाही. कारण त्या पलीकडचे सर्व विषय आहेत. गेली बारा वर्षं अधिक काळ हा रस्ता रखडला हे आमचेच दुर्दैव आहे. या घटनेत येथील आमदार सुदैवाने बचावले आहेत. असेही त्यांनी सांगितले.
मोठ्या अपघातातून वाचलो – नियोजित दौऱ्यानुसार कराडला जाताना बहादूरशेख नाक्यावर सकाळी घडलेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी दुपारी तीनच्या सुमारास थांबलो होतो. त्याचवेळी हा अपघात झाला. केवळ 8 सेकंदात तेथून कार्यकर्त्यांना घेऊन बाजूला झालो. नाहीतर वेगळेच घडले असते. आयुष्यातील सर्वात मोठ्या अपघातातून मी वाचलो. महामार्ग चौपदरीकरण आणि उड्डाणपुलाच्या कामातील चुका दुरुस्ते करून तातडीने हा मार्ग पूर्ण करावा, असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.