संपूर्ण भारत गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या विळख्यात गुंतलेला आहे. या महामारीमुळे आणि तेंव्हा कोरोनावरील लस उपलब्ध नसल्याने अनेक लोकांना वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनामुळे अनेक पालकांचा मृत्यू ओढावल्यामुळे अनेक लहान मुलं आणि विद्यार्थी पोरके झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून निरनिराळ्या मदती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्यांची आणि त्यांच्या शिक्षणाचीही जबाबदारीही घेण्यात आली आहे. आता अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांना २०२२ म्हणजेच येत्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये परीक्षा फी माफ करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एका विशेष कारणामुळे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे.
अनेक विद्यार्थ्यांचे पालक या कोरोनाच्या महामारीचा सामना करत मृत झाले. पुढे त्यांची जबाबदारी कोण घेणार! नातेवाईक काही काळापर्यंत काळजी घेऊ शकतात, पुढे त्यांच्या शिक्षण आणि भविष्याचे काय! त्यासाठी अनेक संस्था सुद्धा त्यांच्या संगोपनासाठी पुढे सरसावल्या आहेत तर शासनाने सुद्धा त्या संदर्भात तरतूद केली आहे.
शिक्षणाच्या बाबतीत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा शुल्क भरण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सदर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचालीत खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.