कोरोना संक्रमणामुळे राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्या मागील महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यात आल्याने आणि संसर्गित रुग्णांची संख्या कमी झाल्याने मंदिरे आणि शाळा सुरु करण्यात आल्या. त्यासुद्धा ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सध्या सुरु झालेत. पण पहिलीपासूनचेही वर्ग सुरु करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षक, पालकही आणि शाळा चालकही आग्रही दिसून येत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालच्या बैठकीत सर्व शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून त्या लवकरच कृतीमध्ये घडणार असल्याचे दिसून येत आहे. त्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरु लागल्याने शाळा सुरु करण्याबाबत राज्यभरातून दबाव वाढत चालला आहे. विद्यार्थी आणि पालक सुद्धा प्रत्यक्ष शाळा सुरु व्हावी यासाठी प्रचंड दबाव निर्माण करत आहेत.
त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर, येत्या १०-१५ दिवसामध्ये पहिली पासूनच्या सर्व शाळा सुरु करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यते नंतरच लहान वर्गाच्या शाळा सुरु करण्याबाबत निर्णय होईल.
सध्या मुख्यमंत्री यांच्या तब्ब्येतीच्या कारणाने, मानेवरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढे काही दिवसामध्ये राज्यातील कोविड परिस्थितीचा अचूक आढावा घेऊन, त्यानंतरच शाळांबाबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं कळत आहे.
त्याचप्रमाणे लहान वर्गातील मुलांच्या सुरक्षितेसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आणि पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. लहान मुलांना कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात येण्याएवढी त्यांची मानसिकता नसल्याने त्यांची काळजी अजून जबाबदारीने घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळांची असलेली तयारी आणि सुविधा लक्षात घेणे गरजेचे आहे.