उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी निर्णय होत नव्हता. त्यामुळे किरण भैय्या एक पाऊल मागे आले. आता मागे आलो म्हणजे राजकारण थांबवले असे नाही. भविष्यात एकना एक दिवस किरण सामंत हे खासदार होणार आणि खासदारकीवर आमचा दावा आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी किरण सामंत, सुदेश मयेकर आदी उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती.
रत्नागिरी- सिंधुदुर्गची जागा ही धनुष्यबाणाला मिळावी. शिवसेनेच्यावतीने एकमेव उमेदवार किरण सामंत होते. सगळी स्ट्रॅटेजी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ठेवलेली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्याशी आमची चर्चा झाली होती. या सर्व चर्चेनंतर एका निर्णयापर्यंत आम्ही आलो की, ज्या पद्धतीने तिकीट वाटपाबाबत चर्चा ताणली गेली आहे की, अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आला तरी उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा संभ्रम आहे.
कालच्या बैठकांनंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांना कुठेही त्रास होऊ नये यामुळेच स्वतः किरण भैयाने एक निर्णय घेतला. किरण यांचा मानसन्मान महायुतीमध्ये केला जाईल, असे आश्वासन स्वतः अमित शहा, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
भूमिका घेतली होती – राणेंना उमेदवारी जाहीर झाली तर काम करू, अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली. याच्यानंतर आमच्या सगळ्या कुटुंबाची देखील चर्चा झाली. कुटुंबांनी असा निर्णय घेतला की, नारायण राणे हे ज्येष्ठ आहेत, राजकीय नेते आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत, केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे थांबण्याची भूमिका आम्ही घेतल्याचे सामंत यांनी सांगितले.