तालुक्यातील हर्णे ग्रामपंचायतीने कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्याची मोहीम राबवली जात असून, १०० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. उर्वरित मोहीम टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचे हर्णे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी कृष्णा साळुंखे यांनी सांगितले. हर्णे परिसरात गेली कित्येक वर्षे कुत्र्यांची दहशत आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत, तर तीन व्यक्तींचा मृत्यूही झाला आहे. हर्णैमधील संपूर्ण परिसरात कुत्र्यांची संख्या खूप वाढली आहे. कुत्र्यांचे हल्ले करणे, चावा घेणे, वाहनांचा पाठलाग करणे आदी अनेक घटनांमुळे येथील नागरिक फिरायला बाहेर पडताना नेहमीच एखादी काठी हातात घेऊन बाहेर पडतात. कुत्रा चावून जखमी झाल्यावर रेबीज लस घ्यावी लागते. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात प्रचंड घबराट निर्माण झाली होती.
यावर ठोस उपाययोजना राबवण्यासाठी हर्णे ग्रामपंचायतीने पावले उचलली आहेत. पुणे येथील पेट फोर्स संस्थेला यासाठी पाचारण केले आहे. ही संस्था नर व मादी कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी व त्यांना अँटीरेबीजची लस देत आहेत जेणेकरून कुत्रा चावल्यावर विषबाधा होणार नाही. ही प्रक्रिया झाल्यावर त्यांना जेथून पकडले तिथे सोडले जात आहे. या कुत्र्यांना पकडण्यासाठी संस्थेची टीम व गाडी हर्णैमध्ये फिरत आहे. गेले दोन दिवस ही मोहीम सुरू असून, आजपर्यंत १०० कुत्र्यांची नसबंदी झाल्याचे पेट फोर्सचे प्रमुख विनोद साळवी यांनी सांगितले.
एका कुत्र्यासाठी दोन हजारांचा खर्च – या मोहिमेमध्ये २०० कुत्र्यांचा टप्पा पार करायचा आहे. एका कुत्र्याच्या नसबंदीला किमान २ हजार रुपये खर्च येत आहे. संपूर्ण गावामध्ये किमान ४५० ते ५०० कुत्र्यांची संख्या आहे. सर्वच कुत्र्यांना ही नसबंदी प्रक्रिया आणि अँटीरेबीजची लस द्यायची आहे. मोहीम राबवण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन हर्णे ग्रामपंचायतीने केले आहे.