अवैध मायनींग हटाव अशी मागणी करत दापोली तालुक्यातील मांदिवली येथील ग्रामस्थ विधिमंडळावर धडकले. तर मायनींगच्या या त्रासाबाबत येथील ग्रामस्थ मुंबईत आक्रमक होताना दिसले. यावेळी ग्रामस्थ फलक हातात घेऊन ही अवैध मायनींग हटविण्याची मागणी करत होते. येथील मायनींग विरोधी कार्यकर्ते भावेश कारेकर यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरूवारी हे ग्रामस्थ मुंबईत धडकले. या मायनींगबाबत येथील ग्रामस्थांनी शासनाकडे न्याय मागितला होता. मात्र स्थानिक जिल्हा प्रशासन यांनी येथील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नसल्याने शेवटी या ग्रामस्थांनी विधिमंडळाची पायरी गाठली. यापूर्वी २०२३ ला या ठिकाणी जनसुनावणी झाली होती. ही जनसुनावणी स्थगित झाली होती. जनसुनावणी स्थगित होऊनही जिल्हा प्रशासनाने या मायनींग प्रकल्पाला परवानगी दिली आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
निसर्गसंपदा असताना या ठिकाणी झाडं तोडावी लागणार नाहीत असे शासनाने रिपोर्ट मध्ये म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी झाडांची तोड सुरू आहे, असे एक गावकरी कारेकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. तर या मायनींगला राजकीय पाठबळ आहे म्हणून या ठिकाणी कारवाई होत नाही सरकारने परवानगी दिली हा प्रकल्प चालविणारच अशी दंडेलशाई या ठिकाणी सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. केंद्रशासनाने या प्रकल्पावर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत मात्र स्थानिक प्रशासन ही कारवाई करत नाही, असा देखील ग्रामस्थांचा दावा आहे.