राजापूर शहरातील तीव्र उताराच्या मुख्य रस्त्यासह गर्दीचे ठिकाण असलेल्या जवाहर चौकात मोकाट गुरे ठाण मांडून बसलेली असतात. तसेच राजापूर-धारतळे पावस-रत्नागिरी या मार्गावरही कशेळी, रातांबशेंडा, धारतळे, कोलापूर फाटा, सोलगाव, तेरवण फाटा, बारसू या परिसरात तर, मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली, उन्हाळे, हातिवले रस्त्यावर जनावरांचा वावर असतो. रात्री काळोखामध्ये बसलेली ही गुरे वाहनचालकांना जवळ येईपर्यंत दिसत नाहीत. काहीवेळा भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची धडक बसून जनावरांना अपघात होतो. त्यात मुकी जनावरे जखमी होतात किंवा त्यांना प्राणही गमवावा लागतो. वाहनचालकांकडून जोरजोरात हॉर्न वाजवला प्ररीही, जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून राहतात. त्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होते.
पालिकेच्या कोंडवाड्याची दूरवस्था – मोकाट गुरांविरोधात कारवाई केली तर पकडलेल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी पालिकेने शहरात कोंडवाडा उभारला आहे. त्याचे छप्पर मोडकळीस आलेले असून, छप्पराचे पत्रे सडलेले आहेत. रस्त्याच्या बाजूने त्याला झाडाझुडपांनी वेढलेले आहे. या कोंडवाड्याची पार दुरवस्था झाली आहे. मोकाट गुरे पकडल्यानंतर त्यांना कोंडवाड्यात ठेवल्यास त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. एका बाजूला मोकाट गुरे पकडण्याची मागणी केली जात असताना, पकडलेल्या गुरांना ठेवण्यासाठीच्या कोंडवाड्याची अवस्था वाईट आहे. याकडे फारसे कुणीही लक्ष देत नाही.
कारवाईला मालकांकडून केराची टोपली – राजापूर शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांना चाप लावण्यासाठी पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली होती. त्यात गेल्या दोन वर्षांत १४ हजारांचा दंड केला, यावर्षी तीन हजार रुपयांचा दंड केला आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईनंतरही मोकाट जनावरांचा वावर कमी झालेला नाही. त्यामुळे पालिकेच्या कारवाईची जनावरांच्या मालकांना भीती राहिलेली नाही.
बेफिकीरपणा वाढतोय – रस्त्याने भरधाव धावणाऱ्या वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात जनावरांचा मृत्यू झाल्यास त्या अपघाताला वाहनचालकाला जबाबदार धरले जाते. काहीवेळा जनावरांचे मालक नुकसानभरपाईही घेतात; मात्र, मुळातच मालकांनीच आपली जनावरे मोकाट सोडली नाहीत योग्य ती खरबरदारी घेऊन घरीच बांधून ठेवल्यास त्यांचा रस्त्यावरील वावर कमी होईल, तसेच अपघातांनाही आळा बसेल. ही बाब जनावरांच्या मालकांनी लक्षात घेतली पाहिजे.
गुरांच्या गळ्यात रेडियम नाईट ग्लो पट्टे – रस्त्यामध्ये बसलेल्या वा रस्ता ओलांडणाऱ्या मोकाट गुरांना धडक देऊन अपघात टाळता यावा यासाठी राजापूरमध्ये बजरंग दलातर्फे मोकाट गुरांच्या गळ्यामध्ये रेडियम नाईट ग्लो पट्टे बांधलेले आहेत. रात्री रस्त्याने घावणाऱ्या वाहनांचा प्रकाश पडून हे रेडियम नाईट ग्लो पट्टे चमकतात. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यास मदत होते. या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रामपंचायतींना निर्देश – मोकाट गुरांसह ती सोडणाऱ्या गुरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी बांधकाम विभाग, पंचायत समिती, पोलिस विभाग, नगरपालिका प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याची तत्काळ दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतींना गुरांच्या मालकांवर कारवाई करण्यासाठी सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचवेळी पशुसंवर्धन विभागालाही इअरटॅगिंग करण्याची सूचना केली आहे. पोलिसांसह संबंधित प्रशासनाला अशाप्रकारे मोकाट गुरे सोडणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती देण्याचे धाडस ग्रामपंचायती दाखवतील का ? हे महत्त्वाचे आहे.

