चिपळूण शहरातील पेठमाप तांबटआळी परिसरात गुरुवारी सकाळी एका शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्यांपासून स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ही विद्यार्थिनी रस्त्या लगतच्या गटारात पडल्याने जखमी झाली. सुदैवाने, स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेने शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पेठमाप परीटआळी, येथे राहणारी एक शाळकरी विद्यार्थिनी परांजपे मोतीवाले स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी ६.३० वा.च्या सुमारास ती सायकलवरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. ती तांबटआळी परिसरात पोहोचली असता, अचानक भटक्या कुत्र्यांच्या एका टोळीने तिच्यावर हल्ला चढवला. या अनपेक्षित प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली आणि सायकलवरून खाली कोसळली. कुत्र्यांपासून वाचण्यासाठी धावत असताना तिचा तोल गेला आणि ती उघड्या गटारात पडली.
या अपघातात तिच्या हातापायाला दुखापत झाली असून शाळेचा गणवेशही फाटला व खराब झाला आहे. मुलीचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कुत्र्यांना पळवून लावले. नागरिकांच्या या समयसूचकतेमुळे मुलीचा जीव वाचला, अन्यथा कुत्र्यांनी तिला गंभीररीत्या जखमी केले असते अशी भीती व्यक्त होत आहे. चिपळूणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संतांप व्यक्त होत आहे. पहाटेच्या वेळी फिरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे सावट असून पालिकेने या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

