नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी यांनी मंगळावार पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. बुधवारी मुंबई येथील लाँगमार्चमध्ये देखील कर्मचारी सहभागी होणार असल्याने चक्क दोन दिवस हे कामबंद आंदोलन चालणार आहे. चिपळूण नगरपालिकेतील कर्मचारी देखील सहभागी होणार असून तसे निवेदन त्यांनी येथील मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. कर्मचारी दोन दिवस संपावर जात असल्याने शहरातील दैनंदिन सेवेवर त्याचा परिणाम होण्याची श्यक्यता आहे. नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न व मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.
त्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून सतत पाठपुरावा देखील करण्यात येत आहे. वेळप्रसंगी कर्मचाऱ्यांनी उपोषणे, कामबंद आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र प्रत्येकवेळी फक्त आश्वासने देऊन वेळ मारून नेण्यात आली आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे व समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संघर्ष समितीने पुन्हा एकदा या संदर्भात आवाज उठवण्याची भूमिका घेतली आहे.
नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीने मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी कामबंद आंदोलन तसेच सीबीडी बेलापूर ते मुंबई मंत्रालय असा लाँगमार्च काढण्याचा निर्णय घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याची भूमिका घेतली असून तसे पत्र, सर्व कर्मचारी संघटनांना पाठविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने चिपळूण मधील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी होणार असून ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लाँगमार्च मध्ये देखील येथील कर्मचारी सहभागी होणार आहेत.
याउपर जर शासनाने दखल घेतली नाही तर अत्यावश्यक सेवेत देखील सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात येईल. निवेदन त्यांनी चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना दिले आहे. नगरपालिका कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी होणार असल्याने शहरातील दैनंदिन सेवेवर त्याचा परिणाम होण्याची श्यक्यता आहे. चिपळूणचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्याप्रमाणात रोजच्या नागरीसुविधा पुरवण्यासाठी कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आवश्यक असतो. मात्र आता कर्मचारी व संवर्ग कर्मचारी दोन दिवस संपावर जात असल्याने अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे